भारताचा नामिबियावर विक्रमी विजय

नवी दिल्ली : इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर भारताने नामिबियाचा ९३ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकात अनोख्या विक्रमाची नोंद केली. धावांच्या विजयी फरकाच्या दृष्टीने हा भारताचा टी-२० वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी भारताचा सर्वात मोठा विजय २०१२ च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध ९० धावांचा होता. धावांच्या फरकाने सर्वात मोठ्या विजयांच्या यादीत भारत सध्या दहाव्या क्रमांकावर आहे. यासोबतच टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपमध्ये सलग १० सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. हा विक्रम क्रिकेटविश्वात ऐतिहासिक मानला जात आहे. भारताने या सलग दुसऱ्या विजयासहीत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ बाद २०९ धावा उभारल्या, तर प्रत्युत्तरात नामिबियाचा डाव १८.२ षटकांत ११६ धावांत संपुष्टात आला.

इशान किशनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत अवघ्या २४ चेंडूत ६१ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत पाच षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. संजू सॅमसनने ८ चेंडूत २२ धावा करत वेगवान सुरुवात केली. मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. कर्णधार सूर्यकुमार यादव (१२) यालाही फार काळ टिकता आले नाही. मधल्या फळीत हार्दिक पंड्याने २८ चेंडूत ५२ धावा करत डाव सावरला. शिवम दुबे बरोबर (१६ चेंडूत २३) त्याने पाचव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचत भारताला २०९ धावांपर्यंत पोहोचवले. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड एरॅस्मसने ४ षटकांत २० धावांत ४ बळी घेत प्रभावी मारा केला. त्याच्या विविधतेमुळे काही काळ भारतीय धावगती रोखली गेली.

२१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकली नाही. वरुण चक्रवर्तीने २ षटकांत ७ धावांत ३ बळी घेत सामन्याचा वेग भारताकडे वळवला. महत्वाचं म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवने ६ गोलंदाज वापरले आणि त्या सहाही जणांच्या खात्यात विकेट पडल्या. अखेरीस नामिबियाचा डाव ११६ धावांत आटोपला आणि भारताने ९३ धावांनी दणदणीत विजय साकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *