अभिनेता सुव्रत जोशी-अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या उपस्थितीत
महा अंनिसच्या ‘युवा संकल्प अभियाना’चा व्हॅलेंटाईन डेला डोंबिवलीत समारोप
ठाणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड विभागा’तर्फे राबविण्यात आलेल्या ‘युवा संकल्प अभियाना’चा समारोप शनिवारी, १४ फेब्रुवारी , व्हॅलेंटाईन डेला सकाळी १० ते सायंकाळी ४ या धेळेत डोंबिवली पश्चिम येथील स. हैं. जोंधळे पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात होणार आहे. या समारोप परिषदेला प्रसिद्ध अभिनेता, नाट्यकलाकार व निर्माता सुव्रत जोशी व  अभिनेत्री शर्मिला शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव बावगे असतील, तर उद्घाटन स. हैं. जोंधळे पॉलिटेक्निक कॉलेजचे सचिव देवेंद्र जोंधळे यांच्या हस्ते होणार आहे.
या परिषदेत जोडीदाराची विवेकी निवड, प्रेम, लैंगिकता, सामाजिक दबाव, कायदे व समावेशकता या विषयांवर परिसंवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. या परिसंवादात अनिल उकरंडे, आरती नाईक यांच्यासह तृतीयपंथी (Transgender) समुदायातील प्रतिनिधी वक्ता सहभागी होणार असून, युवक-युवतींसाठी हे सत्र मार्गदर्शक व प्रबोधनात्मक ठरणार आहे.समाजात विवाह, प्रेमसंबंध व सहजीवनाबाबत असलेले गैरसमज, अंधश्रद्धा व दबाव याविरोधात विवेकी भूमिका मांडणे, तसेच तरुण पिढीला स्वतंत्र, समतावादी व जबाबदार निर्णयक्षम बनवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. जोडीदाराची निवड हा प्रत्येक युवक-युवतीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र या निर्णयाकडे अनेकदा पुरेशी पूर्वतयारी, समज आणि गंभीरतेने पाहिले जात नाही. परिणामी, वैवाहिक जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. आज समाजात जोडीदार निवडीचे प्रामुख्याने दोनच मार्ग रूढ आहेत — पारंपरिक ‘कांदेपोहे’ पद्धतीतील अल्प वेळेचा परिचय कार्यक्रम किंवा प्रेमविवाह. या दोन्ही पर्यायांमध्ये अनेक मर्यादा असल्याचे समितीचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर समितीने ‘परिचयोत्तर विवाह’ हा अधिक समंजस आणि विवेकाधिष्ठित पर्याय पुढे आणला आहे. या उपक्रमांतर्गत लग्नाळू युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांसोबत संवादशाळा घेऊन विवेकपूर्ण निर्णय प्रक्रियेवर भर दिला जातो.समितीने या अभियानासाठी पाच सूत्रे निश्चित केली आहेत :१ प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घेणे, २ बौद्धिक, भावनिक आणि मूल्यात्मक अनुरूपता तपासणे, ३ हुंडा, पत्रिका आणि व्यसनांना स्पष्ट नकार देणे, ४ लग्न साधेपणाने करणे, ५ आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाच्या शक्यता सकारात्मकतेने पडताळणे. अभियानादरम्यान युवक-युवतींची परस्पर संमती, जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता, आवडी-निवडी, स्वभाव, शारीरिक-मानसिक-आर्थिक सुदृढता, विचारसरणी आणि भविष्याविषयीची स्वप्ने या सर्व बाबींवर चर्चा केली जाणार आहे.
विवाहातील अपयश आणि तणाव कमी करण्यासाठी हा एक सकारात्मक पर्याय असल्याचे समितीचे मत आहे. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी :रेश्मा खाडे: ९४२१११४८७९, कविता मते: ९५७९१०५०५८, डाॅ सुषमा बसवंत: ९८९२३८०४७३, अनिल ठाणेकर(पत्रकार) : ९५९४६७९९२६ यांना संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *