शिवसेनेचा घराघरांत पोहचला ‘महाआरोग्य’ आणि ‘लोकसेवा’ यज्ञ – प्रताप सरनाईक
मिरा-भाईंदर,-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे केवळ नाव नाही, तर लाखो शिवसैनिकांसाठी एक ऊर्जास्त्रोत आणि सामान्यांसाठी आधारवड आहेत. त्यांच्या विचारांतील ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा मंत्र प्रत्यक्षात उतरवत, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मिरा-भाईंदर शहरामध्ये जनसेवेचा एक महाकुंभ भरला आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मिरा-भाईंदर शहर शाखांच्या वतीने २३ जानेवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण शहरात ‘महाआरोग्य आणि मोफत दाखले वाटप शिबिराचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. राजकारणापलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम या उपक्रमातून अत्यंत प्रभावीपणे होताना दिसत आहे.
मिरा – भाईंदर शहरातील एकूण २४ प्रभागांमध्ये दररोज हे शिबिर आयोजित केले जात आहे. यामध्ये केवळ प्राथमिक तपासणी नाही, तर हृदयरोग, कर्करोग, एन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि संधिवातासारख्या गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि उपचार दिले जात आहेत. डोळ्यांची तपासणी करून गरजू रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येत असून, थायरॉईड आणि दम्यासारख्या आजारांवरही विशेष लक्ष दिले जात आहे.सरकारी कागदपत्रांसाठी सर्वसामान्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात, ही वस्तुस्थिती ओळखून शिवसेनेने आधार कार्ड, रेशनकार्ड, डोमासाइल, उत्पन्न दाखला आणि ई-श्रम कार्डासह अनेक महत्त्वाचे दाखले याच शिबिरात मोफत उपलब्ध करून दिले आहेत. “आपलं काम हक्काने होतंय,” ही भावना नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत आहे.
मिरा-भाईंदरच्या कानाकोपऱ्यातून या शिबिराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच बाळासाहेबांना दिलेली खरी ‘आदरांजली’ ठरत आहे. उच्चशिक्षित डॉक्टरांची टीम आणि अहोरात्र मेहनत घेणारे शिवसैनिक यामुळे हे शिबिर केवळ एक कार्यक्रम न राहता, ती एक ‘लोक चळवळ’ बनली आहे.”साहेबांनी आम्हाला नेहमीच सामान्यांच्या सेवेची शिकवण दिली. आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मिरा-भाईंदरमधील प्रत्येक नागरिकाला आरोग्य आणि हक्काचे दाखले मिळवून देणे, हे आमचे कर्तव्य आहे,” अशी भावना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *