केंद्रात भाजपाचे मोदी सरकार असतना
बांगलादेशी आले कुठून- आदित्य ठाकरे
मुंबई : मुंबईतील नागरी प्रश्न प्रलंबित असताना महापौरांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर भूमिका मांडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत खड्डे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अपुरे आणि अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ, मोकळ्या जागांवर होणारी अतिक्रमणे, तसेच पाणी आणि हवा प्रदूषण यांसारखे गंभीर प्रश्न आहेत. मात्र, महापौरांचे संपूर्ण लक्ष सध्या बांगलादेशी नागरिकांच्या कथित घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्रीत असल्याची टीका त्यांनी केली. बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे घुसले असल्याचा दावा जर खरा असेल, तर त्याबाबत काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भाजपने द्यायला हवीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
जर बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करत असतील, तर ते देशात आले कसे? देशाच्या पूर्व टोकापासून दक्षिण-पश्चिम भागापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून ते कसे प्रवास करून पोहोचले? गेली दहा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार असताना हे लोक इतका काळ देशात कसे राहिले? अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांनी हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेतील अपयश, गुप्तचर यंत्रणांची चूक की प्रशासनातील त्रुटी आहे का, असा सवाल उपस्थित केला. जर मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असेल, तर ती थांबवण्यात आणि संबंधितांना ओळखून देशाबाहेर पाठवण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आदित्ययांनी थेट भाजपवर निशाणा साधत, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत केंद्र सरकारचे अपयश असल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा राजकीय पातळीवर उचलण्याऐवजी त्यावर ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
