केडीएमसीत ५१ वारसांना नोकरीची संधी;

महापौरांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वाटप

डोंबिवली, दि. १३ फेब्रुवारी (आरती परब) – कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त तसेच मयत सफाई कामगारांच्या ५१ वारसांना लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती आदेशांचे वितरण आज महापौर दालनात करण्यात आले. महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले व आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, सहा. आयुक्त सुषमा मांडगे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे तसेच पालिका सदस्य वरुण पाटील, गणेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

नियुक्ती पत्र देताना महापौर हर्षाली चौधरी यांनी लाभार्थ्यांना शुभेच्छा देत जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन केले. शहराच्या स्वच्छता व विकासासाठी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा द्यावी, असे मार्गदर्शन आयुक्त अभिनव गोयल यांनी केले.

महापालिकेकडून गेल्या वर्षभरात एकूण २३२ वारसांना नियुक्ती पत्रे देण्यात आली असून, वारसा हक्कासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी दोन वेळा मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपआयुक्त वंदना गुळवे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *