पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘सेवा तीर्थ’ या नव्या एकात्मिक संकुलाचे आणि ‘कर्तव्य भवन १ व २’ चे उद्घाटन करून हे संकुल देशाला समर्पित केले.

प्रशासकीय आधुनिकतेचा नवा पत्ता सेवा तिर्थ

नवी दिल्ली : यापुढे भारतीय प्रशासकीय आधुनिकतेचा नवा पत्ता सेवा तीर्थ असा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘सेवा तीर्थ’ या नव्या एकात्मिक संकुलाचे आणि ‘कर्तव्य भवन १ व २’ चे उद्घाटन करून हे संकुल देशाला समर्पित केले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) एका आधुनिक आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा इमारतीत स्थलांतरित झाले असून, हा बदल प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी १०० रुपयांचे विशेष स्मारक नाणेदेखील जारी केले.

उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान मोदी यांनी गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तीचा संदेश दिला. ते म्हणाले की, रायसिना हिल्सवरील नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे बांधकाम ब्रिटिशांनी त्यांच्या सम्राटाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी केले होते. त्या काळातील वास्तुकला ही भारतीय जनतेला दुय्यम लेखणारी होती, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ‘विकसित भारत’ घडवण्याच्या निर्धाराने आपण ‘सेवा तीर्थ’मध्ये प्रवेश करत आहोत. जुन्या इमारतींमध्ये जागेची कमतरता असल्याने कामकाजात अडथळे येत होते, परंतु हे नवीन संकुल केवळ धोरणे आखण्याचे केंद्र नसून ते प्रभावी आणि प्रेरणादायी सुशासनाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे नवीन संकुल पर्यावरणपूरक आणि भविष्याचा वेध घेणारे आहे. ‘सेवा तीर्थ’मध्ये पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय एकाच छताखाली आल्याने धोरणात्मक समन्वयाला गती मिळेल. त्याचप्रमाणे ‘कर्तव्य भवन १ आणि २’ मध्ये अर्थ, संरक्षण, आरोग्य आणि कृषी यांसारखी महत्त्वाची मंत्रालये स्थलांतरित होणार असल्याने सर्वसामान्यांनाही मंत्रालयीन कामासाठी सोयीचे होणार आहे.

हे संपूर्ण संकुल ‘४-स्टार गृह’ मानांकनानुसार बांधण्यात आले असून त्यात डिजिटल पायाभूत सुविधा, स्मार्ट सुरक्षा यंत्रणा आणि सौर उर्जेचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, रिक्त होणाऱ्या ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे रूपांतर आता ‘युगे युगीन भारत’ या भव्य संग्रहालयात केले जाणार असून, यासाठी फ्रान्सच्या तज्ज्ञ संस्थेशोबत करार करण्यात आला आहे.

नव्या दालनातून चार मोठे निर्णय

नव्या कार्यालयात पाऊल ठेवताच पंतप्रधानांनी जनहितार्थ चार मोठे निर्णय घेतले. त्यांनी अपघातग्रस्तांना दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणाऱ्या ‘पीएम राहत’ योजनेला मंजुरी दिली. तसेच, ३ कोटी ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट वेळेपूर्वी पूर्ण झाल्यामुळे आता मार्च २०२९ पर्यंत ६ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे नवीन लक्ष्य निश्चित केले. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी १ लाख कोटींवरून थेट २ लाख कोटी रुपये करण्यात आला असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी १०,००० कोटी रुपयांच्या ‘स्टार्टअप इंडिया फंड २.०’ ला देखील हिरवा कंदिल दाखवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *