बांग्लादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढा- प्रसाद लाड

मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रसाद लाड यांनी BEST, पोलीस वसाहतसह विविध विषय सविस्तरपणे मांडले

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती (DPC) ची बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार प्रसाद लाड यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली व शहराच्या विकासासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. मुंबई शहर अतिक्रमणमुक्त, सुरक्षित आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले ‘वर्ल्ड क्लास’ शहर बनवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीदरम्यान मुंबई शहरातील घुसखोर बांग्लादेशींना बाहेर काढण्याबाबत निर्णय घ्यावा यासाठी आमदार लाड यांनी प्रश्न उपस्थित केला. पूर्व द्रुतगती मार्ग (इस्टर्न फ्री वे) वर बांग्लादेशी घुसखोरांनी कुठेकुठे अतिक्रमण केले आहे, याची माहिती यावेळी लाड यांनी दिली. या बैठकीत मुंबईतील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. वडाळा येथील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार व डागडुजीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. तसेच सायन येथील ऐतिहासिक किल्ला व तलाव यांच्या डागडुजी व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत निधी देण्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे BEST वसाहती आणि पोलीस वसाहतीचा प्रश्न, शहरातील विविध ठिकाणी असलेल्या शौचालयांची पुनर्बांधणी आणि दुरुस्तीचा मुद्दा देखील आमदार लाड यांनी उपस्थित केला. वार्षिक अर्थसंकल्पीय नियोजनाच्या अनुषंगाने पुढील विषयांवर निधीची तरतूद करण्याची मागणी सादर करण्यात आली.

१) सांस्कृतिक पर्यटन

वडाळा येथील प्रती पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जीर्णोद्धार व डागडुजीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणे.

२) ऐतिहासिक पर्यटन

सायन तलाव व सायन किल्ला परिसरातील ऐतिहासिक पर्यटन विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे.

३) पाणीपुरवठा सुविधा

शहराच्या विविध भागातील नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याच्या टाक्या, भूमिगत टाक्या, वॉटर पंप तसेच बोरवेल यासाठी निधी उपलब्ध करून देणे.

४) मुंबई पोलीस निवास व्यवस्था

मुंबई पोलीस दलासाठी पोलीसांच्या वसाहती गृह सुविधा उभारणी व दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून देणे.

५) BEST उपक्रमासाठी सहाय्य

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (BEST) उपक्रमाच्या पायाभूत सुविधा व सेवा सुधारण्यासाठी निधीची तरतूद तसेच त्यांच्या वसाहतीची डागडुजी करणे.

वरील सर्व बाबी मुंबई शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यावर प्रशासन सकारात्मक कार्यवाही करेल, असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. बैठकीत मुंबईतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *