पहिल्याच बैठकीत महापौरांनी दिले नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पाणीपुरवठा विभागाची घेतली आढावा बैठक
ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत काही भागांमध्ये भासत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची पहिलीच पाणीपुरवठा आढावा बैठक घेत नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला थेट हात घातला. महापौर दालनात पाणीपुरवठा विभागासोबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगरअभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
सध्या महापालिका हद्दीत जाणवणाऱ्या पाणीटंचाईचा सविस्तर आढावा घेत ज्या भागांत समस्या अधिक तीव्र आहे, तेथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. शहरात दररोज किती टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो, त्याचे नियोजन, खर्च आणि पारदर्शकता याबाबतही सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितले.
बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका कडे 50 एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याची केलेली मागणी आणि त्याऐवजी मिळालेल्या केवळ ५ एमएलडी पाण्याचा मुद्दा गांभीर्याने मांडण्यात आला. उर्वरित पाणी मिळवण्यासाठी कोणती प्रशासकीय पावले उचलावी लागतील, याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी नगरअभियंता प्रशांत सोनग्रा यांनी या विषयासंदर्भात सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले.
महापालिका हद्दीतील आदिवासी पाड्यांमध्ये नियमित व मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी., याचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक असल्यास अतिरिक्त टँकर वा पर्यायी स्रोतांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.
नवीन बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठा होत असताना जुन्या गृहसंकुलामधून पाणीटंचाईच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी विचारणा केली. यावर घोडबंदर भागासाठी वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध करुन टंचाई दूर करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
कळवा मुंब्रा व दिवा या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी घेवून ठाणे महापालिकेमार्फत वितरीत करण्यात येते, या भागात मोठ्या प्रमाणात तक्रारी असून पाणी आठ ते दहा दिवसांनंतर उपलब्ध होत असल्याबाबत महापौर यांनी सांगितले, या भागासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वाढीव पाण्याची मागणी केली असून या भागातील संप पंप हाऊस व जलकुंभ कार्यान्वित करुन पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत नमूद केले.
ठाणे शहरासाठी आवश्यक त्या ठिकाणी नवीन कूपनलिका खोदणे व जुन्या कूपनलिकांची तातडीने दुरूस्ती करणेबाबत सूचना केल्या. याबाबतचा निविदा मंजूर असून तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये यासाठी साठा व्यवस्थापन, गळती नियंत्रण, दुरुस्ती कामे, टँकर नियोजन आणि पर्यायी स्रोतांचा वापर याबाबत ठोस कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच शहरात अनधिकृत टँकर माफियाच्या जाळ्यावर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
