माणिकराव कोकाटेंनंतर आता नरहरी झिरवळ अडचणीत;
लाचखोरीच्या आरोपावर मंत्र्यांचं मोठं विधान!
हरिभाऊ लाखे
नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यानंतर नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दुसरे मंत्री नरहरी झिरवळ आता मुंबई मंत्रालयातील त्यांच्या कक्षातील कर्मचाऱ्याच्या लाचखोरीमुळे अडचणीत आले आहेत. विरोधकांनी महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचा आरोप करुन उपरोक्त प्रकरणाशी राज्याचे अन्न व औषधमंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी संबंध जोडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यावरून गदारोळ उडाल्यामुळे मंत्री झिरवळ यांनाही स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आपल्यापर्यंत येत असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवल्याने नाशिक जिल्ह्याला दुसरे मंत्रिपद गमवावे लागते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाशिकमध्ये राज्यात सर्वाधिक सात आमदार आहेत. त्यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकला तीन मंत्रिपदे दिली होती. सिन्नरचे ॲड. माणिकराव कोकाटे आणि दिंंडोरीचे नरहरी झिरवळ हे त्यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात उभयतांचा कॅबिनेट मंत्रीपदी समावेश झाला होता. प्रारंभी छगन भुजबळ यांना डावलून त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली होती. कृषि खात्याची जबाबदारी सांभाळणारे ॲड. माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहिले.
विधानसभा सभागृहात कथित रमी प्रकरणानंतर त्यांच्याकडून कृषी खाते काढून क्रीडा खात्याची जबाबदारी दिली गेली. परंतु, पुढील काही महिन्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याच्या प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झाल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याचा ताजा इतिहास आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याने कोकाटेंची आमदारकी कायम राहिली. आता या पक्षाचे दुसरे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयातील लाचखोरीमुळे अडचणीत आले आहेत.
लातूरमधील एका औषध दुकानदाराच्या रद्द केलेल्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी मंत्री झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक राजेंद्र ढेरंग याला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. लाचेची ही रक्कम खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे ढेरंग यांनी पोलिसांना सांगितल्याने झिरवळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्रालयात खुलेआम दलाली सुरू असल्याचे पुन्हा स्पष्ट झाल्याचा आरोप करीत लाचखोर मंत्र्याला पदावरून हटविण्याची मागणी केली. यावर दिल्ली दौऱ्यात असलेल्या झिरवळ यांनी आपली बाजू मांडली. घडलेला प्रकार अतिशय चुकीचा असून ते मूळचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून हा प्रकार घडला असून यात कोणालाही पाठिशी घातले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या आरोपांवर त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे आपल्यापर्यंत येत असल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईल, असे प्रसारमाध्यमांना सांगितले. झिरवळ यांच्या बचावार्थ पक्षाचेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर पुढे आले. मंत्र्यांच्या खात्याचे अनेक कर्मचारी असतात. त्यापैकी कोणी पैसे घेतल्यास मंत्र्यांचा काय संबंध, असे त्यांनी म्हटले आहे. झिरवळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या झिरवळांची शेतमजूर, कामगार, कनिष्ठ लिपिक, सरपंच. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि विधानसभेचे उपसभापती आणि मंत्री अशी आजवरची वाटचाल राहिली. काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर झिरवळांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी दुभंगल्या नंतर अजित पवारांना साथ दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आदिवासी चेहरा उपरोक्त प्रकरणाने अडचणीत आला आहे.
