मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘४७°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न
मुंबई: मुंबई क्लायमेट वीकचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि एसआयईएस इन्स्टिट्यूट, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘४७°C’ या लघुचित्रपटाचे प्रदर्शन व त्यानंतर उपाययोजनांवरील संवाद कार्यक्रम संपन्न झाला.
लघुचित्रपटानंतर ‘हवामान बदल आणि त्याचा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम’ या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित चर्चासत्र पार पडले. यामध्ये लेखक व चित्रपट दिग्दर्शक तेज सिसोदिया, सिविक स्टुडिओचे श्रेय जैन आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी वैचारिक सहभाग घेतला.
यावेळी वाढत्या तापमानाची तीव्रता, शहरी भागातील उष्णतेची समस्या, कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम आणि नागरिकांच्या सहभागाची गरज यावर चर्चा करण्यात आली. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शाश्वत जीवनशैली, पर्यावरणपूरक सवयी आणि स्थानिक पातळीवर राबवता येणाऱ्या उपाययोजनांवर विशेष भर देण्याविषयी भाष्य करण्यात आले.
या कार्यक्रमाला एसआयईएस महाविद्यालय नेरूळ, डी वाय पाटील महाविद्यालय नेरूळ, स्टर्लिंग कॉलेज नेरूळ, बंट्स महाविद्यालय येथील १५३ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपली मते मांडली आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत आयोजित ‘४७°C’ या लघुचित्रपटाचे प्रदर्शन व त्यानंतर उपाययोजनांवरील संवाद हा उपक्रम युवा पिढीमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
