इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे ‘मराठी पाऊल पडते पुढे !’
सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिनाचा अभूतपूर्व जल्लोष
मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील सेंट झेवियर्स हायस्कूल मध्ये मराठी भाषा दिन उत्साह, अभिमान आणि सांस्कृतिकदृष्ट्या दिमाखात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात मराठी भाषेच्या गोडव्याने आणि संस्कृतीच्या रंगांनी भरलेले, भारलेले वातावरण अनुभवास आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोककलेचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार श्री. खंडूराज शंकर गायकवाड तसेच आयफा पारितोषिक विजेत्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ. अंजली सरकाळे उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उंची लाभली.
शाळेचे संस्थापक डॉ. ए. एफ. पिंटो आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती ग्रेस पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे ‘उत्कृष्ट शिक्षणाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष’ सध्या साजरे होत असून, त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विशेष ठरला.
भाषण, कविता आणि नाट्यरूपातून मराठीचा गौरव
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता, नाट्य सादरीकरण आणि समूहगीतांच्या माध्यमातून मराठी भाषेचा इतिहास, वैभव आणि तिचे सांस्कृतिक स्थान प्रभावीपणे मांडले. छोट्या कलाकारांच्या ओजस्वी सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची वाहक असल्याचे अधोरेखित केले. “भाषा जपली तर संस्कृती जपली जाते आणि संस्कृती जपली तर समाज सुदृढ राहतो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी वाचन, लेखन आणि अभिव्यक्ती अधिक समृद्ध करण्याचे आवाहन केले.
प्रेरणादायी समारोप
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. मराठी भाषा दिनानिमित्त साजऱ्या झालेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात भाषाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *