शिकाऱ्यांच्या टोळीकडून बिबटयाची क्रूरपणे हत्या
हाताचे पंजे तोडून नखे केली लंपास दोन जणांना अटक
ठाणे : शहापूर उपवनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील वाशाळा वनपरिक्षेत्रातील मौजे ढाकणे चिंध्याचीवाडी कळभोंडा येथे नदीच्या पात्रालगत एक मृत अवस्थेत बिबट्या आढळुन आला आहे.शिकारी टोळीने या बिबट्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करुन बिबट्याच्या पायाचे पंजे तोडून नखे काढून घेतली आहेत.बिबटयाच्या शिकारीच्या या घटनेमुळे शहापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.या घटनेमुळे वन्यप्राणी प्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.या बिबट्याच्या शिकारी प्रकरणी टोळीतील दोन जणांना अटक करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
तथापि बिबट्याचची शिकार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी वाशाळा वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी धाव घेतली घटनास्थळी पशुवैद्यकीय
अधिकारी यांच्या पथकाला बोलावून सदर मृत बिबटयाचे घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले आहे.सदर वन्यजीव हत्या प्रकरणी शहापूर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे असून बिबटयाच्या शिकारी प्रकरणी संशयीत दोन आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.जेरबंद केलेल्या या दोन्ही आरोपींची आता सखोल चौकशी केली जात असून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी बिबट्याची हत्या करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.अटक केलेल्या आरोपांनी
बिबट्याची नखं कुठे लंपास केली की अन्य कोणाला विकली आहेत का तसेच या बिबट्याच्या शिकारी मध्ये शिकारी टोळीत आणखी किती आरोपींचा सहभाग आहे.याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ रोंगटे यांनी माहिती देताना सांगितले.वन्य प्राण्यांची हत्या करुन त्यांच्या अवयवांची तस्करी करणारी एक टोळी शहापूर तालुक्यात सक्रिय झाल्याचे या घटनेमुळे स्पष्ट होत असून बिबट्याच्या क्रूरपणे झालेल्या शिकारीमुळे वन्यजीव प्रेमी मध्ये एकच हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणाची वनविभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *