नाशिकमध्ये गॅसचा ‘काळा खेळ’
२६ लाखांच्या मुद्देमालासह ४५७ सिलिंडर जप्त
हरिभाऊ लाखे
नाशिक – एलपीजी गॅसच्या टंचाईची ओरड एकिकडे होत असताना शहरात सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सातपूर औद्योगिक वसाहतीत केलेल्या कारवाईतून उघड झाले. यावेळी ४५७ घरगुती-व्यावसायिक सिलिंडर आणि पाच वाहने असा सुमारे २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गॅस वितरकासह कर्मचारी अशा आठ जणांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. महात्मानगर येथील समर्थ गॅस एजन्सीमधील हा माल आहे. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर एका वाहनातून दुसऱ्या वाहनात संशयास्पदरित्या भरले जात होते. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, अपर तहसीलदार अमोल निकम, एचपीसीएलचे भूपेन पाटील आणि बीपीसीएलचे राजकुमार यादव घटनास्थळी दाखल झाले. त्यांना मोठ्या संख्येने सिलिंडरचा साठा आढळला. चाके जमिनीत रुतलेल्या आणि नादुरुस्त वाहनातही मोठ्या संख्येने सिलिंडर होते. दोन मालवाहू वाहनेही सिलेंडर भरण्यासाठी उभी होती. पथकाने कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता संबंधितांनी काळ्या बाजारात त्यांची विक्री केली जात असल्याचे मान्य केल्याचे पुरवठा विभागाने तक्रारीत म्हटले आहे.
या कारवाईत सुमारे १३ लाख रुपयांची ४५७ घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि तीन मालवाहू वाहने ताब्यात घेण्यात आली. काळ्या बाजारात गॅस सिलिंडरची विक्री केल्या प्रकरणी गॅस एजन्सीधारक हर्षल सरनाईक (वॉटरफ्रंट सोसायटी, जलालपूर) याच्यासह प्रवीण साळुंखे, समाधान सोळंकी, रवींद्र खंडाळे, सिद्धार्थ निराळे, तेजस आढळकर, प्रितम राजपूत, व्ही. प्रताप या कर्मचाऱ्यांविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भेडसावत आहे. सिलिंडरचा काळा बाजार जोमाने सुरू असल्याचे पुरवठा विभागाच्या कारवाईतून समोर आले.
गोदाम, सिलेंडर वितरणाची छाननी
समर्थ गॅस एजन्सीचे कार्यालय महात्मानगरला तर गोदाम विल्होळी येथे आहे. सिलिंडरचे वितरण नियमानुसार या दोनपैकी एका ठिकाणाहून होणे अपेक्षित असते. सातपूर औद्योगिक वसाहतीत एजन्सीने वाहन नेण्याचे काहीच कारण नव्हते. महत्वाचे म्हणजे ज्या वाहनात सिलिंडर आढळली. ते नादुरुस्त आहे, त्या वाहनाची चाके जमिनीत रुतलेली आहे. सिलिंडरच्या पावत्याही कर्मचाऱ्यांना सादर करता आल्या नाही. हा संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी सांगितले. प्रशासनाने एचपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. संबंधित एजन्सीच्या गोदाम व कार्यालयाची सखोल तपासणी करावी. मागील १० दिवसांत संबंधितांकडे किती गॅस सिलिंडर आले आणि त्यांनी किती सिलिंडरचे वितरित केले याची छाननी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन पुढील कारवाई करणार आहे.
