नूतन विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
मुंबई: महाराष्ट्र मंडळ (भाभा अणुसंशोधन केंद्र) शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यामंदिर शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीणजी सावंत, राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे, कबड्डी प्रशिक्षक नितीनजी पवार उपस्थित होते. यावेळी लेझीम आणि ढोल पथकाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका सुचिता पवार व ज्येष्ठ शिक्षिका संध्या चंदनशिवे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स-साहित्य व्यायाम प्रकार आणि मनोऱ्यांचे चित्तथरारक सादरीकरण केले. प्रवीणजी सावंत यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळांची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले. तर इंद्रजीत मोरे यांनी खेळाडू घडवण्यासाठी बालपणापासूनच व्यायामाची गोडी हवी, असे सांगितले. नितीन पवार यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत बक्षीस नेहमीच प्रेरणादायी असते, असे नमूद केले. हर्ष कदम आणि समृद्धी वाक्षे या विद्यार्थ्यांना आदर्श खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.
