बहुभाषिक चर्मकारांना संघटित करण्याचा निर्धार!
 राष्ट्रीय चर्मकार संघाचा शानदार रौप्य महोत्सव सोहळा धारावीत संपन्न

मुंबई : चांभार, ढोर, मोची, जयस्वार, रेगर, होलार, जाट, कक्कया आदी विविध जाती-पोटजातींमध्ये विखुरलेल्या चर्मकार समाजाची एकजूट घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटित शक्ती सरकारसमोर उभी करण्याचा निर्धार राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार बाबुराव माने यांनी व्यक्त केला.

धारावी येथील पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो चर्मकार बांधव-भगिनींच्या उपस्थितीत राष्ट्रीय चर्मकार संघाचा रौप्य महोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानावरून बोलताना माने यांनी उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटकसह विविध राज्यांतील चर्मकार समाजातील सर्व जाती-उपजातींना एका छताखाली आणण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. या संघटित शक्तीच्या बळावर शासन दरबारी अनेक वर्षे रखडलेल्या मागण्या मार्गी लावण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सबलीकरण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक भूमिहीन चर्मकारांना मोफत जमिनी मिळवून देण्यात संघटनेने पुढाकार घेतल्याचा अभिमानाने उल्लेख करताना माने म्हणाले की, गावोगावी जात-दांडगे व धन-दांडग्यांकडून बळकावलेल्या जमिनी सरकार, पोलीस व न्यायालयीन स्तरावर लढा देऊन परत मिळवून देण्यात संघटना यशस्वी ठरली आहे. तसेच चर्मकार समाजातील महिलांवरील अत्याचार प्रकरणांत आरोपींना शिक्षा होईपर्यंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने लढा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहकांच्या चपला-बुटांची दुरुस्ती करणाऱ्या चर्मकार कामगारांना फेरीवाले ठरवून मुंबई-ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरातून हटवण्याच्या प्रयत्नांनाही संघटनेने विरोध केला. गेल्या पंचवीस वर्षांत सामाजिक क्षेत्रात अशा अनेक लढ्यांद्वारे संघटनेने कामगिरी बजावली असल्याचा आढावाही त्यांनी मांडला.

प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी आपल्या भाषणात चर्मकार समाजाला सामाजिक-राजकीय लढ्यासाठी तयार करण्याचे कार्य माने सातत्याने करत असल्याचे गौरवोद्गार काढले. बौद्ध, मातंग आणि चर्मकार समाजाने एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत प्रकरणे वाढू नयेत यासाठी पोलीस तसेच प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे मत अ‍ॅड. नारायणराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती

या रौप्य महोत्सवी सोहळ्यास प्रबुद्ध साठे, प्रा. विजय मोहिते, अ‍ॅड. सिद्धार्थ हत्तरकर, पांडुरंग साळवी, अक्षय आंबेडकर, निवृत्ती सावळकर, रामभाऊ कदम, परशुराम इंगोले, सूर्यकांत गवळी, विलास गोरेगावकर, जगन्नाथ खाडे, गणेश खिलारे, शारदाताई नवले, दिलीप गाडेकर, अशोक देहरे, हनुमंत सोनावणे, अरविंद जयस्वाल, अर्चना शिंदे, पायल खरे आदींसह हजारो समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *