विश्वास सामाजिक संस्थेतर्फे २८ मार्च रोजी ‘मर्मबंधातली ठेव’
पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्मृत्यर्थ विशेष कार्यक्रम
ठाणे : पंडित प्रभाकर कारेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २८ मार्च रोजी दुपारी `मर्मबंधातली ठेव’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना मोफत प्रवेश असून, कार्यक्रमाच्या प्रवेशिका ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांचे दादा पाटील वाडी येथील जनसंपर्क कार्यालय व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले आणि विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमित वाघचौरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या गायकीचा ठसा रसिकमनांवर गेली अनेक वर्षे उमटविणारे अलौकिक स्वरप्रतिभा, कसदार आणि भारदस्त आवाज लाभलेले तसेच दाणेदार आकर्षक तानांसाठी ओळखले जाणारे गुरुतुल्य गायक आणि गोमंतकीय रत्न, पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर अर्थात सर्वांचे लाडके कारेकर बुवा होत. शास्त्रीय गायनाव्यतिरिक्त त्यांनी अभंग, नाट्यसंगीतात आपली विशेष छाप पाडली आणि नाट्यसंगीताचे वेड असलेल्या रसिकमनावर अधिराज्य गाजवले. बऱ्याच संगीत नाटकातील प्रसिद्ध नाट्यपदं तसेच अभंग,भावगीतं कारेकर बुवांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली, त्यांच्या नावावर कोरली गेली आणि लोकप्रिय झाली. प्रिये पहा, चंद्रिका ही जणू, सुकांत चंद्रानना, धन्य आनंद दिन, शतजन्म शोधिताना, बोलावा विठ्ठल, करिता विचार सापडले वर्म, ही त्यातील काही निवडक गाजलेली गीते आहेत.
कारेकर बुवांच्या याच गाजलेल्या, आणि काही निवडक रचनांचा “मर्मबंधातली ठेव” हा कार्यक्रम होणार आहे. गायक श्रीरंग भावे, ओंकार प्रभुघाटे, केतकी भावे जोशी, गोव्यातील संदेश खेडेकर आणि कारेकर बुवांचे जेष्ठ शिष्य आणि ठाण्यातील नामवंत गायक पंडित सुरेश बापट हे कारेकर बुवांना सांगीतिक मानवंदना देतील. नीला सोहनी, हर्षल काटदरे, सुहास चितळे, गणेश मेस्त्री आणि धनंजय पुराणिक या प्रतिथयश वादकांची समर्पक साथ लाभणार आहे. तसेच अनघा मोडक या निवेदनाची धुरा सांभाळतील.
