शाहीर सिताराम शिंदे व लेखिका दीपा पवार यांना महा. अनिसचा ‘समता सन्मान पुरस्कार’ बहाल

अनिल ठाणेकर

ठाणे, विवेक जागर संस्था अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्हा यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘समता सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, गीतकार व गायक शाहीर सिताराम शिंदे तसेच लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा पवार यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम जनता केंद्र, ताडदेव, मुंबई सेंट्रल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंनिसचे राज्य पदाधिकारी विजय परब, नंदकिशोर तळाशीलकर, पत्रकार अमेय तिरोडकर, व्हिजन फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच मुंबई जिल्ह्यातील विविध शाखांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर शिंदे यांनी अंनिससाठी लिहिलेल्या गीतांनी झाली. घाटकोपर शाखेच्या निर्मला माने यांनीही स्वरचित गीत सादर केले. ‘Give to Gain’ या महिला दिनाच्या थीमवर आधारित सत्रातून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश यांनी प्रास्ताविक करत स्त्री-पुरुष समानतेविषयी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मान्यवरांचे व्हिडिओ प्रदर्शित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तुषार शिंदे यांनी दीपा पवार यांची, तर संदेश बालगुडे यांनी शाहीर सिताराम शिंदे यांची मुलाखत घेतली. दीपा पवार यांनी आपल्या खडतर आणि अंगावर काटा आणणाऱ्या जीवनप्रवासाविषयी सांगताना भारतातील सुमारे ११ टक्के म्हणजे जवळपास १५ कोटी लोक नोंद नसलेल्या श्रेणीत जगत असल्याचे वास्तव मांडले.पालावरच्या जीवनातून आंतरराष्ट्रीय परिषदांपर्यंतचा प्रवास ‘माझ्या समस्या मीच मांडेन’ या प्रेरणेने घडल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील वंचित घटकांच्या समस्या जगासमोर मांडत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शाहीर सिताराम शिंदे यांनी पत्रिकेतील भाकितामुळे परिचित कुटुंबातील लग्न मोडल्याची घटना पाहिल्यानंतर अशा अंधश्रद्धांविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र अंनिसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. महिलांच्या प्रश्नांवर भाष्य करणारी आशयसंपन्न गाणी त्यांनी लिहिली असून ती महाराष्ट्रभर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. “मला सत्कार करून निवृत्त करू नका; तुमच्यासोबत काम करत राहायचे आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना पत्रकार अमेय तिरोडकर म्हणाले की, सध्याच्या पत्रकारितेवर भाष्य करत समाजात प्रश्न निर्माण करणारी पत्रकारिता आवश्यक आहे. दीपा पवार व शाहीर शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याचे त्यांनी कौतुक केले. ‘समता सन्मान’ हा केवळ सोहळा नसून विचार पुढे नेणारा उपक्रम आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका सवाखंडे यांनी केले. शेवटी ‘हम होंगे कामयाब’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *