ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी कबड्डी स्पर्धा – २०२६
शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांची उपांत्य फेरीत धडक दिली.
ठाणे :- शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धेत उपांत्या फेरीत धडक दिली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात सुरु असलेल्या प्रथम श्रेणी पुरुषांच्या उपांत्यापूर्व फेरीत कल्याणच्या शिवशंकर मंडळाने विजय क्रीडा मंडळाचा प्रतिकार ४१-३१ असा मोडून काढत उपांत्या फेरी गाठली. पूर्वार्धात लोण देत २३-१६ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशंकरने उत्तरार्धात आणखी एक लोण देत १० गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. मंगेश सोनावणे, सुमित साळुंखे यांच्या धारदार चढयांना तुषार भोईर याची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. विघ्नेश चौधरी, रोनक पाटील यांचा चढाई पकडीचा खेळ विजय मंडळाचा पराभव टाळण्यास
दुसऱ्या सामन्यात जय बजरंग-वाशिंद संघाने श्री समर्थ मंडळावर ४१-१९ अशी सहज मात केली. आक्रमक खेळ करीत जय बजरंगने पहिल्या डावात २ लोण देत २५-०८ अशी आघाडी घेत आपला विजयाचा पाया रचला. दुसऱ्या डावात सावध खेळ करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. राजू कथोरे, दर्शन पवार यांच्या झंझावाती चढयांना अतुल देसलेची मिळालेली पकडीची साथ यामुळे जय बजरंगने सहज विजय मिळविला. श्री समर्थच्या ओमकार म्हात्रेचा या सामन्यात प्रभाव पडला नाही. मोरया मंडळाने जय बजरंग-खारेगाव संघाचा ५०-२४ असा पाडाव करीत उपांत्या फेरी गाठली. विश्रांतीपर्यंत ३लोण देत ३०-१० अशी आघाडी घेत मोरयाने आपला विजय आधीच निश्चित केला होता. विश्रांतीनंतर औपचारिकता पूर्ण करीत आणखी एक लोण देत सामना आपल्या खिशात टाकला. परेश हरड, धीरज तरे, अजय पाटील यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जय बजरंगच्या सोहम मोरे, आर्यन पाटील यांची या सामन्यात मात्र चालली नाही. शेवटच्या सामन्यात जय हनुमान-काल्हेर संघाने हुतात्मा शांतराम संघावर ३७-०८ असा सहज विजय मिळविला. गौरव पाटील, हर्ष भोईर, वैभव पाटील यांच्या तुफानी खेळाने हा विजय सोपा केला.
