सरकार आमच्या घराचे स्वप्न कधी पूर्ण करणार !

अन्यायग्रस्तांचा न्यायासाठी आंदोलनाचा इशारा

मुंबई  / रमेश औताडे

मुंबईतील रेल्वे मार्गालगत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो झोपडीधारकांना पुनर्वसनाचे गोड स्वप्न दाखवण्यात आले. पण आजही अनेक कुटुंबे न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत. आयुष्यभर कष्ट करून, मुलाबाळांसह छोट्या झोपडीत आयुष्य काढणाऱ्या या नागरिकांना आजही स्वतःच्या घराची आस लागलेली आहे. “आम्ही वर्षानुवर्षे आशा धरून बसलो आहोत. सरकारने आम्हाला घर देण्याचे आश्वासन दिले होते. पण आता आमच्याच हक्काची घरे दुसऱ्यांना विकली जात असल्याचे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली,” असे दुःखी शब्द अनेक बाधित नागरिक व्यक्त करत आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व सर्वेक्षण कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि खऱ्या बाधित झोपडीधारकांना तातडीने न्याय देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवक जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांनी केली आहे. रेल्वे विभाग, MRVC आणि MMRDA यांच्या माध्यमातून बाधित नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अनेक पात्र नागरिकांना घरे न देता, त्यांच्या नावावर असलेली घरे परस्पर इतर व्यक्तींना विकल्याचा गंभीर आरोप सचिन लोंढे यांनी केला आहे. त्यामुळे गरीब आणि कष्टकरी कुटुंबांमध्ये प्रचंड नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *