केडीएमसी क्षेत्रात रविवारी ‘नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत साक्षरता परीक्षेचे आयोजन
कल्याण: भारत सरकारच्या ‘नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे येत्या २९ मार्च रविवारी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे शहरातील असाक्षरांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
२०२५-२६ या वर्षासाठी महापालिकेने २००० साक्षरांचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आतापर्यंत १७८१व्यक्तींची नोंदणी पूर्ण झाली असून उद्दिष्टा पर्यंत प्रतिसाद लाभला आहे. आगामी २9 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण १७८१परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत. यामध्ये २५६पुरुष आणि १५२५ महिला परीक्षार्थींचा समावेश आहे. महिला वर्गाचा या अभियानातील सहभाग अत्यंत उत्साहवर्धक आहे.
शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी माहिती दिली की, महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त असाक्षर नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. “केवळ अक्षरांची ओळखच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील मूलभूत संख्याज्ञान आणि व्यवहार ज्ञान नागरिकांना मिळावे, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या चाचणीच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शिक्षण विभाग, शिक्षक आणि स्वयंसेवक पूर्णतः सज्ज झाले आहेत.
