जोडप्यांमधील सारखेपणा…

फार पूर्वीच्या काळी लग्नाचे वर आणि वधू हे दोघेही वयाने लहान असल्यामुळे ते एकमेकांना अनुरूप असल्याचे त्यांच्या घरातील वडील माणसेच ठरवीत होती. काळ बदलला तसे वर आणि वधू आता एकमेकाची अनुकूलता बघतात आणि पालक त्यांचा विवाह लावून देतात. या समारंभातील ‘लक्ष्मीनारायणाचा जोडा’ शोभतोय हे शब्द जुन्या जमान्यातले तर ‘रब ने बनायी जोडी’ हा अलीकडच्या तरुणांमधील संवाद असतो.
परंतु एकमेकांना आवडणे अथवा कुणीतरी तसे ठरवणे यापेक्षाही महत्वाची बाब आता संशोधकांना असे आढळले आहे की खरे तर या लग्नगाठी बहुधा ईश्वर अथवा तशी शक्तीच तयार करीत असावी. कारण विवाह, पैसा, जन्म, आहार आणि मृत्यू या पाच गोष्टींवर माणूस आपला अधिकार चालवू शकत नाही असे एक सुंदर संस्कृत सुभाषित आहे. आता संशोधनातून असे दिसते आहे की जोडपे तयार झाल्यानंतर त्यांच्या शरीरातील काही जीवाणू एकसारखे होतात आणि त्यामुळे आपल्या जोडीदाराचा थेट संबंध आपल्या जठरातील जीवाणूंशीही जोडला जातो किंवा असतोच. फक्त त्याचे प्रमाण आजवर नेमके सापडले नव्हते.
ब्रिटनमधील नॉटिंगहॅम ट्रेन्ट विद्यापीठाचे कॉनर मीहन आणि जॅनेल वेरींडे यांनी केलेल्या संशोधनात असे दिसले की जोडप्यांच्या तोंडातील साधारण ३८ टक्के जीवाणू एकाच प्रकारचे असू शकतात. त्यामुळे जोडपी ही फक्त एकाच घरात राहतात, समान जीवनशैली जगतात आणि साधारणपणे आवडी निवडीही समान असतात यापलीकडे त्यांच्या शरीरावरील आणि शरीराच्या आतील जीवाणूही असे काही प्रमाणात समान असतील तर काय काय होऊ शकेल असा अंदाज करता येईल. माणसाच्या शरीरातील एकूण जीवाणू समूहाला मायक्रोबियोम असे नाव असून यात जीवाणू, रोगाणू आणि बुरशी यांचाही समावेश असतो. आणि हाच समूह आपल्या आरोग्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावीत असतो.
आपल्या स्वत:च्या बाबतीत या समूहाची सुरुवात आपल्या जन्मापासून होते आणि आपल्या आईच्या माध्यमातून आपल्याला रोग-प्रतिकारक शक्ती आणि पचन शक्ती तयार आणि सुदृढ होण्याच्या बाबतीत विविध प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आपल्याला मिळत असतात. आपण वयाने वाढत असतो तेव्हा आपल्या सामाजिक मैत्रीचाही अतिशय नाजूक अशा आपल्या शरीराच्या पर्यावरणावर प्रभाव पडतो. आहार आणि जीवनशैली यांच्यासोबत पती अथवा पत्नीचाही पोटाच्या जीवाणू पर्यावरणावर सर्वाधिक परिणाम होतो. एकटेपणाने राहणाऱ्या लोकांपेक्षा जोडप्यांच्या समान जीवाणूंमध्ये अधिक विविधता असते. या विविधतेमुळे जोडप्यांमध्ये पोटाचे काही विकार कमी प्रमाणात आढळले आहेत. रुमिनोकोक्कस या प्रजातीचे जीवाणू मधुमेहाला कारणीभूत ठरू शकतात.
त्वचा ही माणसाच्या शरीराचा सर्वात मोठा भाग मानला जाते. त्यातील जिवाणूंचे पर्यावरण आपल्यापैकी प्रत्येकासाठी वेगवेगळे असते. जितका बोटाचा ठसा स्म्हात्वाचा तितकाच त्वचेचा ठसाही असतो. पायावरचे जीवाणू साधारणपणे ३५ टक्के समान असतात तर डोळ्यांवरील जीवाणू १७.५ टक्के समान दिसले आहेत. शरीरातील हेच जीवाणू रोगांशी लढतात, अन्न पचायला मदत करतात आणि आवश्यक पोषक घटक तयार करतात हेही लक्षात ठेवायला हवे…

काहीतरी नवीन…

श्याम तारे
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *