धारावीत लवकरच सुरु होणार आंदोलनाचा धडाका
धारावी बचाव आंदोलनची माहिती
मुंबई,दि.२७ — धारावीतील झोपडपट्टीवासियांना प्रत्येकी ५०० चौ.फू. चे घर देण्याबाबत राज्य सरकार करीत असलेली टाळाटाळ, धारावीतील सर्व झोपडपट्टीवासियांना धारावीतच घरे देण्याचे आश्वासन राज्य सरकार अजुनही देत नाही, धारावीतील झोपड्या एसआरए अदानी कंपनी मोठ्या प्रमाणात अपात्र करीत आहे, या प्रमुख मुद्द्यांकडे राज्य शासन,एसआरए व अदानी कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी ‘धारावी बचाव आंदोलन’ या संघटने तर्फे येत्या ५ एप्रिल नंतर व्यापक आंदोलन धारावीत सुरु करण्यात येणार आहे.
या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी धारावी बचाव आंदोलनचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्वाची बैठक बुधवारी सायंकाळी धारावीत झाली. या बैठकीत अदानी कंपनी आणि राज्य सरकार विरोधात काढण्यात येणारे मोर्चे, करण्यात येणारी निदर्शने ,रास्ता रोको, जनसभा आयोजित करण्याबाबतचे वेळापत्रक निश्चितीबाबत चर्चा झाली.या बैठकीस २०० कार्यकर्ते उपस्थित होते. आता आगामी धडक, व्यापक आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी आणखी एक बैठक ५ एप्रिल रोजी धारावीत होणार आहे.या बैठकीनंतर आंदोलनाचा धडाका सुरु होणार आहे.
हुसकावून लावण्यासाठी अपात्र करण्याचा धडाका
धारावी झोपडपट्टीवासियांना ५०० चौ.फू.ची घरे देण्याची आमची मागणी ही पहिल्यापासूनच आहे.तसेच कोणालाही अपात्र न करता सर्व सव्वा लाख झोपडपट्टीवासियांचे धारावीतच पुनर्वसन करावे हीही मागणी सुरवाती पासूनची आहे.तसेच झोपडपट्टीवासियांच्या सर्व्हेक्षणाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत.यात १०० झोपड्यांमागे १५/२० झोपड्या पात्र बाकीच्या ८०\८५ झोपड्या अपात्र… हे असे येथील झोपडपट्टीवासियांच्या संतापाचे कारण आहे. येथील झोपडपट्टीवासियांना हुसकावून लावण्यासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात अपात्र केले जात आहे असा आरोप धारावी बचाव आंदोलनचे नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी केला आहे.सरकार हे झोपडपट्टीवासियांच्या मदतीसाठी आहे की अदानीच्या मदतीसाठी आहे असा प्रश्न सध्या येथील लोकांना पडलेला आहे.लोकांच्या मनातील या असंतोषाला मोकळी वाट करुन देण्यासाठी धारावीत ५ एप्रिल नंतर धरणे, मोर्चे,निदर्शने करण्यात येणार आहेत असेही बाबुराव माने यांनी सांगितले.
दरम्यान हे आगामी आंदोलन यशस्वी करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन चे कार्यकर्ते पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत. हे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी नगरसेवक जोसेफ कोळी,टी.एम.जगदीश,दीपक काळे व नगरसेविका अर्चना शिंदे यांची भेट घेतली तेंव्हा या स्थानिक नगरसेवकांनीही या आगामी आंदोलनास पाठिंबा दिला असून ते ही या आंदोलनात उतरणार असून तसे त्यांनी आश्वासन धारावी बचाव आंदोलनला दिलेले आहे.याच बरोबर या आंदोलनात खासदार अनिल देसाई,खासदार वर्षा गायकवाड,आमदार महेश सावंत, आमदार ज्योती गायकवाड हेही आपला सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे धारावी बचाव आंदोलन ने म्हटले आहे.
धारावी बचाव आंदोलनचे हे आगामी व्यापक आंदोलन अधिक यशस्वी करण्याच्या सूचना आमदार महेश सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत.त्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे.खासदार, आमदार, नगरसेवक या आंदोलनात उतरणार असल्याने धारावी बचाव आंदोलनचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्साह हा दुणावलेला आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन
धारावीतील झोपडपट्टीवासियांना धारावीतच प्रत्येकी ५०० चौ.फू.चे घर द्या, लोकांना अपात्र करण्याचा खेळ थांबवा,धारावीत छोट्या उद्योगांसाठी स्वतंत्र उद्योग क्षेत्र तयार करा, कुंभार बांधव, कोळी बांधव, गणेश मूर्तिकार यासारख्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाया प्रमाणे जागा देण्यात याव्यात आदी मागण्या धारावी बचाव आंदोलन च्या आहेत.या मागण्यांची पूर्तता लेखी स्वरुपात जो पर्यत अदानी कंपनी – राज्य सरकार करीत नाही तो पर्यंत आमचे हे आंदोलन चालू राहील असा इशारा बाबुराव माने यांनी दिला आहे.
