धोरणात्मक बदलावर जोर द्या- प्रशांत जाधवर
पार्किंग प्लाझा, ए आय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातली धोरणात्मक बदलांबाबत मांडले विचार
ठाणे: ठाणे शहराला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक प्रशांत (राजा) जाधवर यांनी केले. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होत जाधवर यांनी शहराच्या ठोस विकासाची गरज बोलून दाखवताना विकासाबरोबर पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत.
ठाणे महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा ६२२१ कोटी १२ रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच सादर केला. ठाणे महापालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रशांत (राजा) जाधवर यांनी अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेत वेगवेगळे मुद्दे, आर्थिक उपाय योजना आणि उत्पन्नाच्या स्त्रोताबाबत विचार मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दाखला दिला. विकासाभिमुख प्रशासनाकरिता आर्थिक नीतीची अमंलबजावणी करण्यासाठी उत्तम प्रशासकाची आवश्यकता असल्याची यशवंतराव चव्हाणांच्या वाक्याची आठवण करुन दिली. प्रशासकीय सुधारणा आणि महसूलवाढी करता जाधवर यांनी पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी वाहनतळ सुरु करणे, परिवहन सेवेत नव्याने सामील होणाऱ्या दुमजली बसेस फिरते डिजिटल फलक लावणे, महापलिकेच्या शाळा शालेय वेळेनंतर नाममात्र दरात खासगी शिबिरे, कार्यक्रमांना भाड्याने देणे, करवसुली करण्यासाठी १०० टक्के कर भरणाऱ्या गृहनिर्माण संकुलनांना विशेष सवलत देणे, स्वछ व प्रमाणिक गृहनिर्माण संकुल स्पर्धा घेण्याची मागणी केली आहे.
याशिवाय शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी नवीन बांधकामांच्या जागी डास्ट कंट्रोल युनिट सक्तीचे करण्याची गरज जाधवर यांनी बोलून दाखविली. सुमारे एक कोटी रुपयांचे नगरसेवकांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यापेक्षा शहरात राष्ट्रीय महापौर परिषद आयोजित करून त्यातून विकास कामाबाबत विचाराची देवघेव करण्याची सूचना जाधवर यांनी यावेळी मांडली. पालिकेच्या शाळांची रंगरंगोटी करण्यापेक्षा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, रोबोटिक्स लॅब, परदेशी भाषांचे वर्ग सुरु करण्याची आग्रही मागणीही केली.
स्वतः राष्ट्रीय कबड्डीपटू असल्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये विविध खेळांचे हाय परफॉर्मन्स सेंटर सुरु करण्याची मागणी केली. महापालिकेच्या तिजोरीत वाढ होण्यासाठी कांदळवनाभोवती लोखंडी कुंपण लावण्याऐवजी त्याठिकाणी पर्यटन क्षेत्र तयार करताना लाकडी वॉकवेज, बोटिंग सुरू करण्याची मागणी जाधवर यांनी केली. शहरातील सुमारे ९५ टक्के पाण्याचे मीटर्स चोरी झाले असल्याने, सरसकट पाण्याचे मीटर हटवून त्याऐवजी १५६० रुपयांनुसार पाण्याची देयके आकारण्याची सूचना केली. शहरातील नाल्यांची पक्की डागडुजी करणे, विठ्ठल क्रीडा मैदान आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवजी महाराजांच्या स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्याची आवश्यकता असल्याची भावना जाधवर यांनी बोलून दाखवली. प्रशांत (राजा) जाधवर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तिकिटावर प्रथमच निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात प्रभाग क्रमांक सहामधून महापालिकेत प्रवेश केला आहे.
