प्रज्ञा जांभेकरांच्या मुद्द्यांचा मराठी विश्वाने गांभीर्याने विचार करायला हवा…
आजच्या दैनिक बित्तंबातमीच्या अंकात प्रज्ञा जांभेकर यांचा “वेगळा विचार देणारे साहित्य संमेलन” हा लेख वाचण्यात आला. त्यातील अनेक मुद्दे खरोखरीच विचार करण्याजोगे आहेत. त्यामुळे आज हा लेख वाचून जे काही सहज सुचलं तेच वाचकांसमोर मांडायचं असं ठरवलं आहे.
नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ घातलेल्या मराठी प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनावरून जांभेकरांनी हा लेख लिहिला आहे. माझ्यामते प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन हीच एक वेगळी संकल्पना आहे. आज मराठी साहित्यात अनेक वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आहेत. आधी मराठी साहित्य हे एकसूरी होते. मग कालांतराने दलित साहित्य, स्त्री साहित्य, ख्रिस्ती साहित्य, मुस्लिम साहित्य, राजकीय साहित्य, वैद्यकीय साहित्य, औद्योगिक साहित्य, युद्धविषयक साहित्य असे विविध साहित्यप्रकार मराठी वाङ्मयविश्वात निर्माण झाले. प्रशासकीय अधिकारी आणि त्यांचे साहित्य हा देखील एक वेगळा साहित्य प्रवाह आता म्हणता येऊ शकेल.
माझ्या मते लेखक किंवा साहित्यिक हा कुठेतरी त्या व्यक्तीच्या मनात अगदी लहानपणापासूनच रुजलेला असतो. कालांतराने माणूस मोठा होत जातो आणि तो ज्या गोतावळ्यात रमतो, तिथलेच वातावरण त्याच्या लेखनातून दिसून येत असते. झोपडपट्टीत वाढलेला लेखक तिथल्या वातावरणावर अतिशय चांगले लिहू शकतो. तर चाळीत वाढलेला, किंवा बंगल्यात, फ्लॅटमध्ये राहिलेला लेखक तिथल्या वातावरणाचे आणि संस्कृतीचे योग्य चित्रण करू शकतो. प्रशासकीय अधिकारी हा देखील एक माणूसच आहे. त्याचबरोबर प्रशासन म्हणजे देखील मानवी व्यवहाराचा एक भाग आहे. मानवी व्यवहार म्हणजे संवेदनांची देवाणघेवाण आलीच, आणि त्यातून नवे वाङ्मय निर्माण होत असते. प्रशासकीय अधिकारी म्हटला की त्याला किमान आठ ते दहा विभिन्न विचारांच्या व्यक्तींशी दैनंदिन स्तरावर संबंध ठेवून त्यांच्याकडून काम करून घ्यायचे असते. त्याशिवाय प्रशासनातील समस्या सोडवण्यासाठी भेटायला येणारे असंख्य नागरिकही या अधिकाऱ्याच्या संपर्कात दररोज येत असतात. त्यातूनच प्रशासकीय अधिकाऱ्याला दररोज नवे नवे विषय मिळत असतात. मी आधी लिहिल्याप्रमाणे प्रशासन हे देखील मानवी व्यवहाराचेच एक अंग आहे. त्यामुळे प्रशासनात घडत असलेल्या घटनांचे चित्र हे वाचकांचे मनोरंजन करणारे तर ठरतेच, पण अनेकदा वाचकांना प्रशासनसाक्षर करणारेही ते ठरू शकते. त्यामुळे अशा प्रशासकीय अनुभवांवरील ललित अंगाने केलेले लेखन हे नक्कीच वाचकांना कुठेतरी रुचणारे ठरू शकते. मी आधी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील विषयावर ललित अंगाने केलेले लिखाण वाचकांना वैद्यकीय साक्षर करू शकते. खूप वर्षांपूर्वी मला मराठीतील आघाडीचे उद्योजक उद्योगपती गजाननराव पेंढारकर यांनी मराठी साहित्यातून आणि नाटक चित्रपटातून उद्योगपतींचे अतिरंजीत चित्र उभे केले आहे ते पुसून सकारात्मक चित्र उभे करणारे लेखन ललित अंगाने केले जावे अशी सूचना केली होती. त्यातून मराठी परिवारांमध्ये उद्योगस्नेही वातावरण निर्माण होईल अशी त्यांची अपेक्षा होती. मी स्वतः राजकीय कथालेखन करतो. कारण आयुष्यातली ५० वर्षे मी राजकीय पत्रकार म्हणूनच घालवली आहेत. मात्र त्यातून राजकारणातले अंडर करंट्स सामान्य माणसाला कुठेतरी लक्षात यावे हा माझा कायम प्रयत्न असतो. तसेच प्रशासनातील खाचखळगे सामान्य माणसाला ललित अंगाने समजावून सांगितले गेले तर अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुभवावरील लेखनाचा समाजप्रबोधनासाठी निश्चितच फायदा होऊ शकेल.
त्यातही महिला या जात्याच संवेदनशील म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांचे साहित्य हे मानवी व्यवहारांचा संवेदनशील धांडोळा घेणारे असते असे म्हटल्यास वावगे ठरु नये. मराठी साहित्याचा विचार केल्यास त्यात अनेक स्त्री लेखिकांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यात अगदी दुर्गा भागवत इंदिरा संतांपासून तर आजच्या नव्या पिढीतील तरुण लेखिकांपर्यंत सर्वांचाच समावेश करता येईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील अनेक संवेदनशील लेखिका आपल्याला दिसतील. त्यांनी मराठी वांङमय विश्वाला मोलाचे योगदान दिले आहे. जर प्रशासनातील महिला अधिकारी साहित्यिक एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करणार असतील तर ते मराठी वाङ्मय विश्वाला चालना देणारेच ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे स्वागत व्हायलाच हवे.
याच लेखात प्रज्ञा जांभेकरांनी गाव साहित्य संमेलनांची संकल्पना मांडलेली आहे. ही देखील स्वागतार्ह कल्पना आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतीलच मिती ग्रुप तर्फे युट्युब वरील साहित्यरंग या कार्यक्रमात अविनाश पाठक आणि भालचंद्र कुलकर्णी या दोन साहित्यिकांचा परिचय करून देताना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मराठीत अनेक नवीन चांगले साहित्यिक पुढे येत आहेत, मात्र अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यातील फार थोडे लोकसमोर येतात, याबाबत खंत व्यक्त केली होती. अशा गाव पातळीवरील साहित्य संमेलनांमधून अनेक नवसाहित्यिक पुढे येऊ शकतील आणि त्यातून समोर येत असलेल्या नव्या सकस साहित्याचा वाचकांना परिचय देखील होऊ शकेल. त्यामुळे या गाव साहित्य संमेलनाचे देखील गावोगावी आयोजन व्हायला हवे. त्यासाठी सरकार आणि समाज दोघांनीही योग्य ते प्रयत्न करायलाच हवेत.
समाज माध्यमांच्या आव्हानाबाबतही प्रज्ञा जांभेकरांनी आपल्या लेखक लेखात उल्लेख केलेला आहे. आज समाज माध्यमांवर तरुणाई गुंतलेली असल्यामुळे वाचन संस्कृती संपलेली आहे असा आरोप ढोबळ मानाने केला जातो. मात्र समाजमाध्यमांवर तुम्ही लेखन करूनही वाचकांपर्यंत निश्चित पोहोचू शकता. काल-परवाच एक समवयस्क मराठी लेखिका रस्त्यात भेटल्या. त्यावेळी त्यांनी आता वाचतेच कोण अशी खंत व्यक्त केली. त्यावेळी मी त्यांना समाजमाध्यमांवर आज अनेक नवे लेखक सातत्याने कसे लिहीत आहेत याकडे लक्ष वेधले. पूर्वी तुम्ही काहीही लिहिले तरी वृत्तपत्रे, नियतकालिके ते प्रकाशित करतीलच याची खात्री नव्हती. त्यामुळे वाचकांपर्यंत पोहोचायचे कसे हा प्रश्न होता. मात्र समाज माध्यमांनी आता अशा नवलेखकांना एक नवे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. आज समाजमाध्यमांवर तुम्ही काही लिहिले आणि ते प्रकाशित झाले तर भलेही त्याचे मानधन मिळणार नसेल, मात्र अनेक वाचक ते वाचतात आणि प्रतिक्रिया देखील देतात. समाज माध्यमांवरील प्रतिक्रिया बघितल्या की ते लक्षात येते. आज अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक देखील नियमितपणे समाज माध्यमातून दिसत आहेत. यावरूनच चित्र स्पष्ट होते. त्यामुळे समाज माध्यमे हे आता आव्हान न समजता मराठी नवलेखकांनी ती संधी म्हणून बघायला हवी असेही इथे सुचवावेसे वाटते.
प्रज्ञा जांभेकरांनी आपल्या लेखात ग्रंथालयांचा देखील उल्लेख केलेला आहे. आज एकूणच ग्रंथालयांची दुरावस्था आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुरू केलेली अनेक वाचनालये आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर इतर सार्वजनिक संस्थांची वाचनालये देखील आचके देत आहेत. याला सरकारी धोरण जसे कारणीभूत आहे तसेच आमची वाचनालयात जाऊन वाचण्याची कमी झालेली सवय ही देखील कारणीभूत आहे. सरकारी अनुदान मिळाले तर ग्रंथालये सुसज्ज होतीलही. मात्र तिथे वाचकच पोहोचला नाही तर ते अनुदान निष्फळ ठरणार आहे. त्यामुळे ग्रंथालयांना देखील आता कालानुरूप डिजिटल व्हावे लागणार आहे, आणि वाचकांना देखील कालानुरूप बदलावे लागणार आहे.
याच लेखात प्रज्ञा जांभेकर यांनी विविध मराठी लेखिकांनी निर्माण केलेले सकस मराठी साहित्य एकत्रितपणे एकाच स्टॉलवर दिल्लीतील या संमेलनात मांडण्याची संकल्पना जाहीर केलेली आहे. ही संकल्पना देखील अतिशय स्वागतार्ह आहे. मराठी साहित्य विश्वात विविध स्त्री लेखिकांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यात उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सुधा मूर्ती किंवा मग कानडीतील उत्कृष्ट साहित्य मराठी भाषा काम पर्यंत वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या उमा कुलकर्णी असोत, या सर्वांचेच लेखन आज वाचकप्रिय झालेले आहे. त्यामुळे असे तरी लेखिकांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त दिल्लीतच नव्हे तर जागोजागी ग्रंथ प्रदर्शनात स्टॉल लावून प्रयत्न व्हायला हवेत आणि अशा प्रयत्नांचे स्वागतच व्हायला हवे.
प्रज्ञा जांभेकरांच्या या लेखात त्यांनी विविध मुद्दे मांडले आहेत, ते अत्यंत महत्त्वपूर्ण देखील आहेत. मात्र आजच्या या लेखात सर्वच मुद्द्यांचा ऊहापोह करणे शक्य होणार नाही. तरीही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मला जे काही सुचलं ते मी वाचकांसमोर मांडलेले आहे. प्रज्ञा जांभेकरांनी आपल्या लेखात मांडलेल्या एकूण सर्वच मुद्द्यांवर मराठी विश्वाने अतिशय गांभीर्याने विचार करायला हवा असे माझे मत झाले आहे.
सहज सुचलं म्हणून
अविनाश पाठक…
