आत्माराम मोरे स्मृती चषक

जेजे वि. ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आज अंतिम झुंज

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी धडाकेबाज फलंदाज नरेश शिवतरकरच्या नेतृत्वाखालील जेजे हॉस्पिटल विरुध्द दोन दशके कप्तान पदाची धुरा वाहणारे अष्टपैलू प्रदीप क्षीरसागरचा ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल यामधील अंतिम झुंज ३० मार्चला सकाळी ९.१५ वा. शिवाजी पार्क मैदानात प्रारंभ होईल. स्पर्धेमध्ये एकूण १४२ पुरस्कारासह १३ रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. पारितोषिक वितरण सोहळा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेमधील संघटक हिंदुजा हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी जॉय चक्रबर्ती यांचा विशेष गौरव होईल.

आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकादमी सहकार्याने लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत स्पर्धेत कप्तान प्रदीप क्षीरसागरच्या अष्टपैलू खेळासह यशस्वी डावपेचांमुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने बलाढ्य लीलावती हॉस्पिटल, सोमैया हॉस्पिटल आदी संघांना पराभूत केले. रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेत विजेती कामगिरीसुध्दा त्यांनी केलेली आहे. अष्टपैलू रोहन महाडिक, शंतनू मोरे, अरुण परचा, जलद गती गोलंदाज सुदेश यादव, स्वप्नील कांबळे, प्रफुल मारू आदींना सूर गवसलेला असल्यामुळे आत्माराम मोरे ट्रॉफी जिंकण्यासाठी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचे होसले बुलंद झाले आहेत.

प्रतिस्पर्धी जेजे हॉस्पिटलचा संघाची रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धांमध्ये ‘डार्क हॉर्स’ म्हणून ओळख असून गिरनार, आयडियल स्पर्धेचे विजेतेपद देखील पटकाविले आहेत. बलाढ्य संघांना पराभवाच्या खाईत लोटण्याची क्षमता नरेश शिवतरकरच्या नेतृत्वाखाली जेजे हॉस्पिटलने या स्पर्धेतसूद्धा दाखविली आहे. जेजे हॉस्पिटलने बलाढ्य केईएम, बॉम्बे व रहेजा हॉस्पिटल संघावर मिळविलेले विजय कौतुकास्पद होते. अर्धशतकवीर सुभाष शिवगण व प्रकाश सोळंकी, सलामीवीर जगदीश वाघेला, अक्षय सावंत, वैभव नाईक, प्रवीण सोळंकी आदींची खेळपट्टीवरील आक्रमकता अंतिम फेरीची लढत अटीतटीची होण्याचे संकेत आहेत. लीलावती हॉस्पिटल विरुध्द रहेजा हॉस्पिटल यामधील तृतीय क्रमांकासाठी होणाऱ्या सामन्याची नाणेफेक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या हस्ते होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *