तृतीय पंथी नागरिकांसाठी केडीएमसीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत तृतीय पंथी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यामध्ये महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत मोफत टी.बी, एच आय व्ही, एच बी टी, एक्स रे तपासणी करण्यात आली .
आशा वर्कर यांनी आयुष्मान कार्ड, आभा कार्ड याबाबत मोफत सेवा दिली. वुमन्स वेलफेअर फाऊंडेशन संस्थेमार्फ़त मोफत समुपदेशन करण्यात आले,तसेच फोर्टिज हॉस्पिटल यामार्फत ब्लड शुगर, रक्त तपासणी अशा वेगवेगळ्या पद्धतीची आरोग्य तपासणी करण्यात आली. महापालिकेमार्फत तृतीय पंथी नागरिकांसाठी मोफत अन्न धान्य वाटपही करण्यात आले.
यावेळी महापालिका उप आयुक्त, कांचन गायकवाड, शिक्षण समिती सदस्य प्रतीक पेणकर, जतीन प्रजापती, आरोग्य विभागाच्या शहर क्षयरोग अधिकारी डॉ.पौर्णिमा ढाके, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, वुमन्स वेलफेअर फाऊंडेशनच्या संचालिका मिनाक्षी उज्जैनकर व किन्नर अस्मिता सदस्य सिमरन केणे, किन्नर समुदायाचे इतर मान्यवर, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वेळी १६० हुन अधिक तृतीय पंथी यांची तपासणी करण्यात आली.
