दादर युनियन म्हणजे शिस्त – वेंगसरकर

मुंबई  :  “दादर  युनियन म्हणजे शिस्त हे समीकरणच आहे.  तुम्ही क्रिकेट खेळात असाल किंवा नसाल ; पण तुमच्या अंगात  शिस्त भिनलेली असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता, असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले.  दादर युनियन सपोर्टींग क्लब, माटुंगा येथे झालेल्या विजय तुळपुळे कप या १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.  दादर युनियन संघाने अगदी लहान वयातच मला शिस्त शिकवली आणि माझ्या कारकिर्दीत मला त्याचा खूपच फायदा झाला असे त्यांनी पुढे सांगितले.  दरम्यान शिव सेवा संघाने अंतिम फेरीत एम.सी.सी. ठाणे संघावर ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत विजेतेपदाचा चषक उंचावला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या एम.सी.सी. ठाणे संघाला शिवसेवा संघाने २६.३ षटकांत केवळ ८६ धावांत गुंडाळले.  आराध्य लाड (१४/२), दर्श कदम (११/२) आणि सोहम (३/२) यांच्या अचूक गोलंदाजीने ही करामत केली. एम.सी.सी. ठाणे संघासाठी नील चौहान १, शार्दूल जोशी १५, रचित पाटील १०, विराट सिंग १९ यांनाच दोन आकडी धावा करता आल्या.  या आव्हानाचा पाठलाग करताना शिव सेवा संघाने १६ षटकातच २ बाद ८८ धावांची मजल गाठत विजयी लक्ष्य पार केले. सलामीवीर ख्रिस्तियानो बुथेल्लो याने नाबाद ४२ धावांची खेळी करत प्रतिस्पर्धी संघाच्या आव्हानातली हवाच काढून टाकली. त्याला श्रेयस गुळवे याने २३ धावा करत चांगली साथ दिली. अंतिम सामन्यातील  आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आराध्य लाड याची निवड करण्यात आली तर स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजांचा मान शिव सेवा संघाच्याच ख्रिस्तियानो बुथेल्लो  याने मिळविला.  सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून स्वस्तिक मालवणकर याला गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर,  मंगेश भालेकर आणि  ऍडव्होकेट  हर्षद भडभडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक – एम.सी.सी. ठाणे – २६.३ षटकांत  सर्वबाद ८६ (नेहाला चौहान १૭, शार्दूल जोशी १५, रचित पाटील १०, विराट सिंग १९; आराध्य लाड १४ धावांत २ बळी, दक्ष कदम ११ धावांत २ बळी, सोहम  ३ धावांत २ बळी) पराभूत वि. शिव सेवा  – १६ षटकांत २ बाद ८८ (ख्रिस्तियानो बुथेल्लो  नाबाद ४२, श्रेयस गुळवे २३) सामनावीर – आराध्य लाड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *