एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सहकार्य करण्याची राष्ट्रवादीची मागणी
वल्ली राजन यांनी घेतली तहसीलदारांची भेट
कल्याण : सध्या एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सिलेंडर बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नाही, तसेच काही ठिकाणी काळाबाजार, अतिरिक्त पैसे आकारणी आणि जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून सर्व गॅस एजन्सींनी सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन ग्राहकांना पूर्ण सहकार्य करावे, बुकिंगनुसार वेळेत सिलेंडर वितरण करावे, कोणत्याही प्रकारची अतिरिक्त पैसे आकारणी किंवा काळाबाजार करू नये अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते वल्ली राजन यांनी कल्याणच्या तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देत केली आहे.
ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर ठराविक वेळेत गॅस पुरवठा करावा. होम डिलिव्हरीसाठी शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेऊ नयेत. कृत्रिम टंचाई निर्माण करू नये. सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून द्यावा. या बाबींचे पालन न झाल्यास संबंधित गॅस एजन्सीविरोधात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल. तथापि, सद्य परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासन व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन वल्ली राजन यांनी सर्व गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे केले आहे.
