मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर
शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांवर मोठा भर
महापालिकेतील कामाविषयी आमदारांचं पत्रकारांसमोर स्पष्टीकरण
अरविंद जोशी
मिरा-भाईंदर : शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका कडून संतुलित अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून शिक्षण, आरोग्य, परिवहन व पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल घडवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुढील एका वर्षात शहरात लक्षणीय बदल दिसून येतील,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.अशी माहिती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माननीय महापौर डिंपल मेहता, माननीय उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील व माननीय स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेत CBSE बोर्ड सुरू करण्याचा विचार पुढे आणण्यात आला आहे. तसेच एका वर्गात ५० टक्के खाजगी विद्यार्थी व ५० टक्के महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश करण्याचा अभिनव प्रयोग, यासोबतच शिक्षण संस्थांनी शाळा दत्तक घेण्याची संकल्पना, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सेवा सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.याच बरोबर क्रीडा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपक्षण केंद्र, पशु चिकित्सक, अग्निशमन संगणक, मालमत्ता शोध मोहीम, जेष्ठ नागरिक, तलाव सुशोभीकरण, नवीन रस्ते, नाले, वैध्यकीय विभाग, औषध आरोग्य केंद्र, घणकचरा अश्या अनेक गोष्टीचा देखील अर्थ संकल्पात समावेश करण्यात आला आहे.
100 नवी शौचालय, विद्यमान शौचालयांची स्थिती सुधारली जाणार आहे. वाहतूक व बाजार व्यवस्थापनासाठी रामदेव पार्क आणि मिरारोड स्थानक परिसरात तळमजल्यावर फेरीवाल्यांसाठी व्यवस्था व त्यावर पार्किंग सुविधा उभारण्यात येणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचेही स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. तसेच १० एप्रिलपासून शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या कामांना सुरुवात होणार आहे.
पाणी व्यवस्थापनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, परिवहन सेवेतही सुधारणा, आरोग्य क्षेत्रात मोठा निर्णय घेत शहरात MRI मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरवठा आणि डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे.
एकूणच, या अर्थसंकल्पातून मिरा-भाईंदर शहराच्या विकासाचा रोडमॅप स्पष्ट झाला असून आगामी काळात नागरिकांना अधिक सुविधा आणि सुधारित पायाभूत व्यवस्था मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्लेझन्ट पार्क परिसरात लागलेल्या आगीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे, तसेच यासंदर्भात आलेल्या प्रस्तानावर विचार चालू असल्याचे आमदार नरेंद्र मेहता म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरं देत होते. आगी नंतरच्या केलेल्या पाहणीत आमदार तसेच महापौर आणि उपमहापौर यांनी लोकांना नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं होतं.
