नाशिकमध्ये ‘अंनिस’ची राज्यस्तरीय बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद

३ एप्रिलला भोंदूगिरीचा बुरखा फाडणार

हरिभाऊ लाखे

नाशिक: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संघर्ष परिषदेत भोंदूगिरी आणि फलज्योतिषाच्या दुष्परिणामांवर मंथन होणार आहे(छायाचित्र – AI Generated)

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद ३ एप्रिल, सकाळी १० वाजता येथील खुटवड नगरातील सीटु भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे आणि राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे यांनी दिली आहे. परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेत प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबासाहेब बुधवंत, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जयंत ढाके, डी. एल. कराड, ॲड. रंजना गवांदे, दादा चांदणे, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३६ वर्षात हजारो बुवाबाबांचे काळे कृत्य उघडकीस आणले आहे. संघटनेच्या प्रयत्नामुळेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत काही भोंदूंना शिक्षा झाली आहे. यामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे भोंदू आहेत. भोंदूगिरी कशी चालते, राज्यात कोणत्या भागात भोंदू सक्रिय आहेत, यासह वेगवेगळ्या पैलुंवर राज्यस्तरीय परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. परिषदेच्या समारोपप्रसंगी लोकप्रबोधनार्थ शहरातून फेरी काढण्यात येणार आहे.

वाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनानंतर परिषदेचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होईल. परिषदेचे नियोजन डॉ. ठकसेन गोराणे ,विनायक सावळे, कृष्णा चांदगुडे, प्रा. आशा लांडगे, अरुण घोडेराव,सुरेश बोरसे, राजेंद्र फेगडे आदी करीत आहेत. परिषदेसाठी राज्यभरातून तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *