जिद्द, अनुभव आणि खेळातील उत्कटतेची दोन कांस्य पदकांत झळाळी!
गोवा येथे उत्साहात पार पडलेल्या योनेक्स-सनराईज ४८व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन) राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मध्ये देशभरातील तब्बल २००७ खेळाडूंनी सहभाग नोंदवत स्पर्धेची प्रतिष्ठा अधिक उंचावली. या अत्यंत स्पर्धात्मक आणि उच्च दर्जाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडूंनी आपल्या जिद्दीच्या, चिकाटीच्या आणि खेळावरील निष्ठेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत दोन कांस्य पदकांची मानाची कमाई केली. अजिता रविंद्रन यांनी महिला एकेरी ५० वर्षांखालील गटात तर विनोद धराप यांनी पुरुष दुहेरी ७५ वर्षांवरील गटात चमकदार यश मिळवत ठाण्याच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला.
ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे हे दोन्ही खेळाडू केवळ ज्येष्ठच नव्हे तर तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि खेळावरील अपार प्रेम याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे.
महिला एकेरी ५० वर्षांखालील गटात अजिता रविंद्रन यांनी अत्यंत प्रभावी आणि लढाऊ खेळाचे दर्शन घडवले. त्यांनी पहिल्याच फेरीत गुजरातच्या आरती महेश्वरी हिला २१-११, २१-१० अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली. त्यानंतर दिल्लीच्या अंशू महाजन हिच्याविरुद्धचा सामना हा खऱ्या अर्थाने त्यांच्या जिद्दीची परीक्षा घेणारा ठरला. पहिला सेट गमावल्यानंतर त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत २२-२० असा थरारक दुसरा सेट जिंकला आणि तिसऱ्या सेटमध्ये २१-९ अशी सरशी करत सामना आपल्या नावावर केला. पुढील फेरीत उत्तर प्रदेशच्या चौथ्या मानांकित सुषमा हिला २१-५, २१-४ अशा एकतर्फी सामन्यात सहज पराभूत करत त्यांनी आपली वर्चस्व सिद्ध केले. उपांत्यपूर्व फेरीत उर्वशी थापा विरुद्धच्या चुरशीच्या लढतीत त्यांनी संयम, कौशल्य आणि अनुभव यांचा उत्कृष्ट संगम साधत २१-१६, १६-२१, २१-१७ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांना बलाढ्य प्रतिस्पर्धी शालिनी शेट्टीविरुद्ध झुंज द्यावी लागली आणि अखेर पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांच्या एकूण कामगिरीने सर्वांचे मन जिंकले.
पुरुष दुहेरी ७५ वर्षांवरील गटात विनोद धराप यांनी त्यांच्या जोडीदार आनंद घाटे यांच्या समवेत उत्कृष्ट समन्वय आणि अनुभवाच्या जोरावर कांस्य पदकाची कमाई केली. त्यांनी तेलंगणाच्या रोमेश चंद्र ग्रोव्हर आणि कीर्ती मेहता या जोडीवर २१-१९, २१-१४ असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या खेळात दिसलेली समज, टायमिंग आणि कोर्टवरील उपस्थिती यामुळे प्रेक्षकांनी त्यांचे विशेष कौतुक केले. उपांत्य फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांनी दिलेली लढत अत्यंत उल्लेखनीय ठरली.
या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी अत्यंत समाधान व्यक्त करत सांगितले की, “ज्येष्ठ वयोगटातही ठाण्याचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर अशी सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आणि खेळावरील प्रेमामुळे ते केवळ पदके जिंकत नाहीत, तर संपूर्ण पिढीला प्रेरणा देत आहेत.”
ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनीही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, “ज्येष्ठ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश ठाण्याच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यांच्या परिश्रम, सातत्य आणि खेळातील आवड यामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.”
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *