कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिपत्याखालील कल्याण पश्चिमेतील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा रुग्णालय, कल्याण पूर्वेतील  शक्तीधाम रुग्णालय यामध्ये रुग्णसेवा देण्याकरिता सामंजस्य करार तत्वावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करण्याच्या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, शासन निर्णय क्र.एमईडी २०२२ प्र.क्र.२२९/२२/शिक्षण-१, दि.१४/०७/२०२३ या शासन निर्णयानुसार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबरनाथ जिल्हा ठाणे यांनी त्यांच्याकडील विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष रुग्णालयीन अनुभव मिळण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बाई रुमिणीबाई रुग्णालय, शक्तीधाम रुग्णालय व गौरीपाडा रुग्णालय ही रुग्णालये तात्पुरत्या स्वरुपात किमान सात वर्षांसाठी किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतःची स्वतंत्र ईमारत निर्माण होईल यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सामंजस्य कराराद्वारे वापरण्याकरिता हस्तांतरण करण्यासाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबरनाथ यांनी विनंती केली होती.

त्या अनुषंगाने हि रुग्णालये सामंजस्य कराराद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबरनाथ यांना संलग्नित करुन देण्यासाठी सामंजस्य करार सोमवारी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी  यांच्या दालनात करण्यात आला असून यावेळी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी  उपस्थित होते.

सर्वप्रथम बाई रुक्मिणीबाई रुग्णालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबरनाथ यांच्याशी संलग्नित करण्यात येईल व बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे सर्व विशेषज्ञ बाह्यरुग्ण सेवा सुरु करण्यात येतील व त्यानंतर अतिदक्षता विभाग  कार्यान्वित करण्यात येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबरनाथ यांचे आस्थापनेवर आवश्यक अध्यापकीय तसेच तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा रुग्णालय करिता असलेली इमारत ताब्यात घेऊन Gynaecology & Paediatrics Department कार्यान्वित करण्यात येतील. सर्वात शेवटी शक्तिधाम रुग्णालय, कल्याण (पू.) येथील ईमारतीचे आरक्षण बदल झाल्यानंतर सदर रुग्णालय ताब्यात घेऊन तेथे इतर विभाग कार्यान्वित करण्यात येतील.

हि रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांच्याशी संलग्नित झाल्यावर महाविद्यालयामार्फत तज्ञ वैद्यकीय अधिकारी व इतर मनुष्यबळ उपलब्ध होणार असून त्यांच्यामार्फत प्रगत वैद्यकीय सुविधा, विशेषज्ञ सेवा व अतिदक्षता विभागाची सुविधा इ. सुविधा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *