उपमहापौर कृष्णा पाटील यांचा प्रस्ताव
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेच्या भरती प्रक्रियेमध्ये कोव्हिड -१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी व इतर विभागात ठोक पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणीरुपी प्रस्तावाची सूचना उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडणार असून भाजपा गटनेते मुकेश मोकाशी यांनी त्याला अनुमोदन दिले आहे.
ठाणे महापालिकेमध्ये सध्या विविध संवर्गाची सरळसेवेने भरती करण्याची प्रक्रीया चालू असून, त्या अनुषंगाने प्रशासनाकडून कार्यवाही सुरु आहे. परंतू सदर सरळसेवा भरती करतांना, ठाणे महानगरपालिकेत कोव्हीड-१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी व इतर विभागामध्ये ठोक पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करणे जरुरीचे आहे.ठाणे महानगरपालिकेत कोव्हीड-१९ कालावधीत जाहिरातीन्वये विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती केली होती. तसेच काही विभागामध्ये अत्यावश्यक बाब म्हणून ठोक पगारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. परंतू सद्या ठाणे महापालिकेत चालू असलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना प्राधान्यक्रम न दिल्यामुळे त्यांचेवर अन्याय करण्यासारखे होईल अशी भावना उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे. सन २०२२ मध्ये कोव्हीड-१९ च्या कालावधीत ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती, त्यांना महापालिकेच्या आस्थापनेवर घेण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात यावा अशा प्रकारची चर्चा होऊन, त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी प्रशासनास सूचना केल्याचे कृष्णा पाटील यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात नमूद केले असून ठाणे महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती प्रक्रीयेमध्ये कोव्हीड-१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी वर्ग व इतर विभागात ठोक पगारावर काम करणारे कर्मचारी या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन, त्यांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी उपमहापौर कृष्ण पाटील यांनी केली आहे. सदर प्रस्तावाची सूचना आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेऊन, चर्चा करुन, त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची विनंतीही कृष्णा पाटील यांनी केली आहे.
