– राष्ट्रीय विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या कौतुक सोहळ्यात अध्यक्ष खानविलकरांचे शासनाला आवाहन

मुंबई, दि.२० -जिंकायला दम लागतो आणि जिंकल्यावर पाठीवर पडलेली कौतुकाची थाप पुढच्या यशाची आग पेटवते. यंदा ही आग क्रीडाप्रेमी कुणाल केरकर यांनी शरीरसौष्ठवपटूंच्या नसानसांत पेटवली आहे. त्यांच्यासारख्या क्रीडाप्रेमींमुळे मुंबईच्या शरीरसौष्ठवाची ताकद आणखी बळकट झालीय. अशीच कौतुकाची थाप शासनाकडूनही आमच्या खेळाडूंच्या पाठीवर पडायला हवी. राजकीय व्यक्तींनी आमच्या खेळाला आपले बळ दिले तर शरीरसौष्ठवाचा बालेकिल्ला असलेली मुंबई अभेद्य होईल. त्याला कुणीही तोडू शकणार नाही, वाकवू शकणार नाही अशा शब्दांत मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी  राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्या मुंबईकर खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत एक-दोन नव्हे तर १४ पदकांची कमाई करत मुंबईची ताकद अवघ्या हिंदुस्थानला दाखवली होती. या यशानिमित्त पदकविजेत्या खेळाडूंचे कुणाल केरकर यांनी मालाड पश्चिमेला आयर्न पॅराडाइज जिममध्ये कौतुक सोहळ्याचे प्रेरणादायी आयोजन केले ंहोते. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात सक्रिय असलेल्या कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांचा हा पुढाकार शरीरसौष्ठवाला बळ देणारा ठरला. केरकर यांचे शरीरसौष्ठव आणि खेळाडूंवर असलेले प्रेम असेच बळ देणारे होत जावो, असे गौरवोद्गारही याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी काढले. याप्रसंगी केरकर यांनीही आपण खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभे राहू, असे आश्वासन दिले.

या कौतुक सोहळ्यानिमित्त हरमीत सिंग, उमेश गुप्ता, रेखा शिंदे, राजेश तारवे, संदीप सावळे, नीलेश दगडे, विश्वंभर राऊळ, नीलेश गुरव या सुवर्णविजेत्या खेळाडूंसह गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे, नीलेश रेमजे यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच आयर्न पॅराडाइजच्या प्रशांत घोलम, सिद्धांत यादव आणि क्षितीज साळुंखे या शरीरसौष्ठवपटूंनाही सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोहळयाला शरीरासौष्ठव संघटनेचे किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे, राम नलावडे, किरण कुडाळकर, अशोक शेलार, राजेश निकम, जयदीप पवार, विजय झगडे आणि शरीरसौष्ठवातील दिग्गजांसह विजेत्या खेळाडूंचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *