मध्य रेल्वे आरपीएफ पथकाने हाणून पाडला- याप्रकरणी ९ महिलांना अटक

(राजेंद्र साळसकर)

मुंबई- मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने २२ एप्रिलला गाडी क्रमांक १२११५ या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि या गुन्ह्याप्रकरणी ९ महिला गुन्हेगारांना अटक केली. २२ एप्रिलला कुर्डुवाडी स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रतिबंध व शोध पथकाचे (CPDS) हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना ३ महिला संशयास्पद रीतीने फिरताना दिसल्या. या महिलांना त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल विचारपूस करण्यात आली आणि स्थानक सोडून जाण्याचा इशारा देऊन त्यांना सोडून देण्यात आले. परंतु या महिला गाडी क्रमांक २२१०८ लातूर एक्सप्रेसमध्ये चढताना दिसल्या आणि त्यानंतर सोलापूर पथकाला संपूर्ण मार्गावर हाय अलर्ट जारी करण्याची माहिती देण्यात आली. आरोपी जेऊर स्थानकावर उतरल्या, जिथून त्या दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गाडी क्रमांक १२११५ सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चढल्या.

आरपीएफचे पथक आधीच मागावर होते आणि सिध्देश्वर एक्सप्रेसच्या एस्कॉर्टिंग टीमला, म्हणजेच हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांना संदेश देत होते. तसेच, छायाचित्रे व प्रवासी इत्यादींच्या मदतीने संशयितांवर सतत पाळत ठेवत होते.लेडी कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्यासह आरपीएफ कर्मचाऱ्यांचे एक पथक सोलापूर स्टेशनवर तयार होते, जिथे सर्व ९ आरोपी महिला गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. १८ ते ४० वर्षे वयोगटातील या संशयित महिला धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

या आरोपींना जीआरपी/कुर्डूवाडीच्या ताब्यात देण्यात आले आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१०(४) (दरोड्याची तयारी) अंतर्गत गुन्हा क्र. २६/२०२६ द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यामध्ये संशयितांच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेतला जात आहे. या टोळीबाबतची संबंधित माहिती पुणे विभागाला कळवण्यात आली आहे, कारण ते सोलापूर आणि पुणे या दोन्ही विभागांमध्ये कार्यरत आहेत. या प्रदेशात प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) समन्वित प्रयत्नांचे मध्य रेल्वेने कौतुक केले आहे. प्रवाशांना सतर्क राहण्याचा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास रेल्वे अधिकाऱ्यांना कळवण्याचा किंवा मदतीसाठी १३९ डायल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *