ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवित असलेल्या योजनांचे अनुकरण इतर महापालिकांनी करावे – मुकेश सारवान
ठाणे (२०) : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना या अभिमानास्पद असून इतर महापालिकांनी देखील याचे अनुकरण केले तर सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहणारच नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी.गोदेपुरे, उपाआयुक्त जितेंद्र निकम, डॉ. मिताली संचेती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे, आस्थापना अधीक्षक दयानंद गुंडप आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या वतीने १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या दिवशी १० कर्मचाऱ्यांचा गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून सन्मान, सफाई कामगारांसाठी घरे, त्यांच्या वारसांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदावर सामावून घेणे, आरोग्य विषयक सुविधा, पदोन्नती, आतापर्यत वारसाहक्काने दिलेल्या नियुक्त्या यांची सविस्तर माहिती उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी आयोगासमोर मांडली.
सफाई कर्मचारी हा महत्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. तसेच महापालिका देखील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्या तातडीने मार्गी लावत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीत ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी निवेदने सादर केली त्या निवेदनांवर १५ दिवसात अहवाल आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचात्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, मासिक वेतन वेळेवर अदा करणे, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधन दिली जातात, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते तसेच महिला कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी तपासणी  केली जाते या  सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई  कर्मचारी  आयोगाच्या उपाध्यक्षांनी  समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *