दुर्गाडी किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त, पोलिस प्रशासन सतर्क
कल्याण : बकरी ईदच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी बुधवारी सायंकाळी शहरात पथसंचलन केले. विशेषतः दुर्गाडी किल्ला परिसर आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गामाता मंदिराशेजारील ईदगाहमध्ये दरवर्षी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने बकरी ईदची नमाज अदा करतात. नमाजसाठी मोठी गर्दी होत असल्याने रस्त्यावरही नमाज अदा केली जाते. याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेश आणि पूजा-अर्चनेचा मुद्दा दरवर्षी चर्चेत येत असतो. काही हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे की नमाजच्या वेळी हिंदू भाविकांना मंदिरात प्रवेश रोखला जातो. तसेच नमाज सुरू असताना घंटानाद होऊ नये म्हणून मंदिरातील घंटादेखील बांधण्यात येतात.
या मुद्द्यावरून दरवर्षी आंदोलन केले जाते. सुमारे ४० वर्षांपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी नमाजच्या वेळी मंदिर प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर दरवर्षी ईदच्या काळात पोलिस प्रशासन विशेष सतर्कता बाळगत आहे. यंदा भाजपच्या वतीनेही नमाजच्या वेळी मंदिर प्रवेशाची मागणी केल्याने पोलिस प्रशासनाची धावपळ वाढली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी पथसंचलन केले. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *