हरिभाऊ लाखे
नाशिक : महापालिकेमार्फत पाथर्डी फाटा- पाथर्डी गाव पिंपळगाव खांब फाटा या महत्त्वाच्या मार्गावरील नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मान्सूनपूर्व तयारीला वेग देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील ओएफसी, महा आयटी सीसीटीव्ही आणि एमएनजीएल गॅस पाइपलाइनची सर्व युटिलिटी कामे शंभर टक्के पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महापालिकेच्या नवीन नाशिक विभागाअंतर्गत येणारा हा डांबरी रस्ता सुमारे ३.८६२ किलोमीटर लांबीचा असून, ३१ मे २०२६ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. वाढती वाहतूक आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता रस्ते मजबुतीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. सध्या मार्गावरील नादुरुस्त पॅचेसची दुरुस्ती सुरू असून, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.
स्टॉर्म वॉटर लाइन अंतर्गत २०० मीटर काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. महापालिका प्रशासनाने ओएफसी, गॅस पाइपलाइन आणि ड्रेनेज कामांमुळे भविष्यात पुन्हा रस्ते खोदकाम होऊ नये यासाठी संबंधित विभागांसोबत समन्वय बैठका घेतल्या आहेत. वाहतुकीवरील परिणाम कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कामांचे नियोजन करण्यात आले असून, दर्जेदार साहित्याचा वापर करून पावसाळ्यात खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.
नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी विभागीय पथक सतर्क ठेवण्यात आली असून रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या आणि युटिलिटी नेटवर्कचा एकत्रित आढावा घेऊन कामांना गती देण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.
कोट
महापालिकेकडून संबंधित विभाग व यंत्रणांच्या समन्वयातून कामांना गती देण्यात येत आहे. मान्सूनपूर्व सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुविधायुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
– मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *