नोकरदार महिला त्रस्त
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील जेथे प्रोबेस स्फोट झाला होता त्या W – १६० ते W – २५१ या लेन मधील कारखान्यासमोर गटाराच्या बाजूस काही तरुण, मध्यमवयीन दारुडे हे रोज सायंकाळी दुचाकी व अन्य वाहनांत येऊन दारू व इतर व्यसने करीत आहेत. सायंकाळ ते रात्री पर्यंत या दारुड्यांचे प्रताप तेथे चालू असतात. येथील कंपन्यांतून सायंकाळी सुटणाऱ्या महिला समक्ष हे प्रकार चालू असल्याने महिला वर्ग दहशतीखाली असून या दारुड्यांनी नशेत काही दुष्कृत्ये केली तर मोठा अनर्थ होणार आहे.
हे नशेखोर दारुडे ठराविक प्रकारची म्हणजे मास्टर्स डीलाईट ही दारू पित असून त्याच्या लाल रंगाच्या प्लास्टिक बाटल्या, पाण्याच्या बाटल्या आणि चकणा साठी घेतलेले पेपर, कागदी डिश या बाजूच्या गटारात फेकून ते अस्वच्छता करीत आहेत. यामुळे गटारात या बाटल्यांचा खच जमा होत आहे. केडीएमसी, एमआयडीसी प्रशासन तर ही गटारे कधीच साफ करीत नाहीत. त्यामुळे येथे दुर्गंधी वाढली आहे. या संदर्भात येथील महिला उद्योजक वर्षा महाडिक यांनी याबाबत फोनवरून तोंडी तक्रार ही मानपाडा पोलिसांना आणि केडीएमसी एमआयडीसी यांच्याकडे केली असून लवकरच यावर कडक कार्यवाही करावी असे त्यानी सांगितले आहे.
