कल्याण : ‘सकल आदिवासी संस्था’ तालुका कल्याण, यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, पालीवली येथे सदिच्छा भेट देण्यात आली. सकल आदिवासी संस्थेच्या संस्थापिका तथा सचिव योगिनी कोसराबे, अध्यक्षा सुचिता बारापात्रे, कोषाध्यक्ष संगीता निनावे, व सहकोषाध्यक्ष उमा निपाणे, तसेच संस्थेच्या ३१ सदस्य अशा ३५ जणींची सकल आदिवासी ही रजिस्टर संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. त्यात मुख्य म्हणजे गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे. या वर्षी सकल आदिवासी संस्थेचा पहिला वहिला कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यात २०० मुलांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल तसेच शालेय साहित्य व बिस्किटांचे वाटप भिवंडी येथील जिल्हा परिषद शाळा, पालीवली येथे करण्यात आले.
येथील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. येथील बहुतेक विद्यार्थी वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबातील असून त्यांना शैक्षणिक साहित्याच्या सोयी सुविधा उपलब्ध नाही. शासनाच्या वतीने योग्य मदत मिळत नाही. असा मुलांचे शिक्षण थांबू नये, त्यांना एक मदतीचा हात मिळावा हे सकल आदिवासी संस्थेचे ध्येय आहे. त्या अनुषंगाने या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
