६ अधिकाऱ्यांवर जबाबदारी, १२ निर्देशांची अंमलबजावणी
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) परिवहन उपक्रमाने (केडीएमटी) बस सेवा अधिक शिस्तबद्ध, वेळेवर आणि प्रवाशाभिमुख करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन व्यवस्थापकांच्या निर्देशानुसार बससेवेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सहा अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून डेपो पाळी प्रमुखांसाठी १२ कलमी निर्देशांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सहाय्यक वाहन अधीक्षक (प्र.) दीपक चौधरी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सध्या केडीएमटीचे दैनंदिन बस वेळापत्रक ९०-०-८९ आहे. शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व नोकरदारांना वेळेत बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी रविंद्र संसारे, किशोर धारावणे, मनीष काळे, संदीप पेणकर, नरेश देहेरकर आणि शालिक टावरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार ड्युटीदरम्यान गणवेश परिधान करणे बंधनकारक राहील. महत्त्वाच्या फेऱ्यांसाठी चालक-वाहकांची वेळेत नियुक्ती करून बस नियोजित वेळेत डेपोतून रवाना करणे, शाळांच्या फेऱ्या कोणत्याही परिस्थितीत रद्द न करणे, बस उशिरा सुटल्यास कारणासह अहवाल सादर करणे, प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे, तिकीट मशीन व रोख रकमेची पडताळणी, महसुलातील तूट वरिष्ठांना कळविणे, अपघात किंवा बस बिघाड झाल्यास तातडीने उपाययोजना करणे, अस्वच्छ बस मार्गावर न पाठविणे, चालक-वाहकांच्या कागदपत्रांची तपासणी तसेच उपस्थितीची खातरजमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याशिवाय सर्व बाबींची नोंद दैनंदिन तपासणी पत्रकात करावी लागणार असून बससेवेवर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. या उपाययोजनांमुळे केडीएमटीची सेवा अधिक कार्यक्षम होऊन प्रवाशांना वेळेवर आणि दर्जेदार बससेवा मिळण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *