२३वे गिरिमित्र संमेलन ११ व १२ जुलैला मुलुंडमध्ये; सियाचीन वीरांचे अनुभव ठरणार मुख्य आकर्षण
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गिर्यारोहण, साहसी क्रीडा आणि राष्ट्रसेवेचा संगम अनुभवण्याची संधी देणारे २३वे ‘गिरिमित्र संमेलन’ ११ व १२ जुलैला महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे होणार आहे. महाराष्ट्र सेवा संघ आयोजित या संमेलनाचे यजमानपद यंदा ‘युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या कांदिवली शाखेकडे असून, ‘युद्धभूमीवरील गिर्यारोहण’ ही संकल्पना यंदाच्या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
संमेलनात भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी सियाचीन हिमनदीवरील ऐतिहासिक ‘ऑपरेशन मेघदूत’ आणि ‘ऑपरेशन राजीव’ या मोहिमांचे अनुभव कथन करणार आहेत. लेफ्टनंट जनरल रमेश कुलकर्णी, लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी आणि परमवीर चक्र विजेते नायब सुभेदार बाना सिंग यांच्या सहभागामुळे हे सत्र विशेष आकर्षण ठरणार आहे. सियाचीनसारख्या जगातील सर्वाधिक उंच युद्धभूमीवर सैनिकांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात केलेला संघर्ष, नेतृत्व आणि शौर्य याविषयी प्रत्यक्ष अनुभव ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. यावर्षीच्या संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी भूषवणार असून, भारतीय हवामान विभागाचे माजी प्रमुख के. एस. होसाळीकर हे प्रमुख अतिथी असतील.
११ जुलै रोजी छायाचित्र प्रदर्शन, गिर्यारोहण विषयक माहितीपट, लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांची मुलाखत तसेच ज्येष्ठ गिर्यारोहक रमाकांत महाडिक यांच्याशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. १२ जुलै रोजी सियाचीन मोहिमांवरील विशेष सत्रांसह गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवरांचा ‘गिरिमित्र पुरस्कारां’द्वारे गौरव करण्यात येणार आहे.
यंदा पारंपरिक छायाचित्रण व ब्लॉग स्पर्धांसोबत प्रथमच ‘रील्स स्पर्धा’ आणि तरुणांसाठी ‘जेन-झी ट्रेकिंग’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे युवकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. गिरिमित्र जीवन गौरव सन्मान पद्माकर गायकवाड यांना जाहीर झाला असून, द्वारका डोखे, भगवान चवले, हितेंद्र मोरे, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, साद माउंटेनिअर्स आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांचाही विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. संमेलनाचे प्रमुख अनिल भंडारी यांनी साहसप्रेमी, गिर्यारोहक आणि नागरिकांनी या अनोख्या पर्वात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पहिल्या दिवशी प्रदर्शन व स्टॉलसाठी प्रवेश विनामूल्य असून, दोन दिवसांच्या संमेलनासाठी ८५० रुपयांचे डोनर पास उपलब्ध आहेत. नोंदणीची माहिती ‘गिरिमित्र’च्या संकेतस्थळावर आणि फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *