अनिल ठाणेकर
ठाणे: महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाने लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान सभेत  केली.
महाराष्ट्राला लोककलेचा समृद्ध वारसा लाभला असून लोककला ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून लोकप्रबोधन, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारशाची जपणूक करणारे प्रभावी माध्यम आहे. या लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन विविध लोककला महोत्सव आयोजित करत असून लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदानही देत आहे.
सन २००८ पासून तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत आणि संगीतबारी या लोककलांना शासनाकडून अनुदान दिले जात आहे. आता या योजनेत नव्याने ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या लोककलांचाही समावेश करण्यात आला आहे.
झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील १३० वर्षांहून अधिक परंपरा असलेली वैशिष्ट्यपूर्ण लोकनाट्य परंपरा आहे. वहीगायन ही धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील लोकप्रिय लोककला असून, नमन खेळे आणि जाखडी या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत.
या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे प्रत्येकी १० लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार: झाडीपट्टी – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये. वहीगायन – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये. नमन खेळे – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये. जाखडी – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये असे स्वरूप राहणार आहे.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *