प्रशासन, पोलिस व कार्यकर्त्यांच्या समन्वयातून नागरिकांना दिलासा
डोंबिवली, ७ जुलै (आरती परब): आज मोठागाव रेल्वे फाटकावर एका मालवाहू रेल्वेगाडीचे इंजिन अचानक बंद पडल्याने रेल्वे फाटकामध्येच गाडी थांबली. परिणामी मोठागाव, कोपर रोड तसेच परिसरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा नगरसेवक स्थायी समिती सदस्य दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेत आपल्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठवून वाहतूक नियंत्रणासाठी मदतकार्य सुरू केले. तसेच वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. वाहतूक कोंडीची तीव्रता लक्षात घेऊन कोपर रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची व्यवस्था करण्यात आली.
यासोबतच दिपेश म्हात्रे यांनी संबंधित रेल्वे व DFCCIL अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पर्यायी इंजिन पाठविण्याची मागणी केली. त्यानुसार काही वेळातच दुसरे इंजिन घटनास्थळी दाखल झाले आणि बंद पडलेली मालवाहू रेल्वेगाडी रेल्वे फाटकावरून हलविण्यात आली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात यश आले.
यावेळी दिपेश म्हात्रे यांनी संयम राखून सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणारे मोठागाव ग्रामस्थ मंडळ, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. याबाबत बोलताना दिपेश म्हात्रे म्हणाले, “नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या समन्वयातून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असून अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देणे हेच आमचे कर्तव्य आहे.”
०००००
