संजय वढावकर यांची माहिती
अनिल ठाणेकर
ठाणे, केंद्र सरकारच्या चार नवीन श्रमसंहितांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने तयार केलेल्या नियमावलींना हिंद मजदूर सभा आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने केलेल्या तीव्र विरोधानंतर महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. कामगार संघटनांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या सूचना व आक्षेपांचा समावेश असलेला संयुक्त अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. तोपर्यंत महाराष्ट्रात श्रमसंहिता नियमांची अंमलबजावणी केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.
हिंद मजदूर सभेचे राज्य सरचिटणीस संजय वढावकर यांनी बैठकीत स्पष्ट भूमिका मांडत चारही श्रमसंहितांमधील अनेक तरतुदी कामगारांच्या कायमस्वरूपी नोकऱ्या, संघटनात्मक अधिकार, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या असल्याचे निदर्शनास आणून दिले. कोणत्याही परिस्थितीत कामगारांच्या हिताला बाधा पोहोचेल असे नियम स्वीकारले जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली
हिंद मजदूर सभा व कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली ३ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर संघटनांच्या शिष्टमंडळाची विधान भवनात कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत हिंद मजदूर सभेने कामगारांच्या हक्कांशी संबंधित विविध मुद्दे ठामपणे मांडले. या बैठकीस कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे संजय वढावकर, निवृत्ती धुमाळ, डॉ. कैलास कदम, गोविंदराव मोहिते, विवेक मोंटेरो, सुकुमार रामदे, संतोष चासगे, उदय भट, बजरंग चव्हाण, फुंडकर रिंगोटे यांच्यासह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, राज्यातील कामगार आणि कर्मचाऱ्यांचे हित सुरक्षित ठेवणे ही शासनाची प्राथमिकता असून, त्यासाठी चार स्वतंत्र तज्ज्ञ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या कामगार संघटना, तज्ज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सर्व सूचना, आक्षेप आणि शिफारशींचा समावेश असलेला एकत्रित अहवाल तयार करतील.
यानंतरच हा अंतिम अहवाल मंजुरीसाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. त्यामुळे कामगार संघटनांची चर्चा पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्रात श्रमसंहिता नियमांची अंमलबजावणी होणार नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
याबाबत हिंद मजदूर सभा आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने ही भूमिका कामगार चळवळीचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत, कामगारांच्या हितासाठी पुढील लढाही तितक्याच ताकदीने सुरू राहील, असा निर्धार व्यक्त केला. विशेषतः संजय वढावकर यांनी शासनाने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत संघटना सतर्क राहणार असल्याचे स्पष्ट केले.
००००००००
