अनिल ठाणेकर
ठाणे-कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रासी चाळ येथे काल घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. यावेळी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या १२ वर्षीय बालकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली.
ही चाळ सुमारे २५ ते ३० वर्षे जुनी असून, पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनास्थळी पाहणीदरम्यान आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती काळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा करून दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली. जखमींना तातडीने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, मृत बालकाच्या कुटुंबाला शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत द्यावी तसेच या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
यावेळी परिसरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींचे तातडीने संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील, अशीही भूमिका त्यांनी मांडली. दुर्घटनाग्रस्त कुटुंबाच्या दुःखात आपण पूर्णपणे सहभागी असून त्यांना न्याय आणि आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू, असा विश्वास आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *