मुंबई: बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय टेबल टेनिस संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये मिथुन निमसटकरने पुरुष गटाचे तर सुभ्रदिता कर्माकरने महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. तोडीस तोड खेळ करीत रंगलेल्या अंतिम सामन्यात अखेर बिगर मानांकित मिथुन निमसटकरने निर्णायक क्षणी आपल्या भात्यातील अचूक फटके साधले आणि गतविजेत्या कुलदीप वार्ष्णेयचे आव्हान ११-५, ९-११, १३-११ असे संपुष्टात आणले. महिलांच्या अंतिम फेरीत गतविजेत्या सुभ्रदिता कर्माकरने द्वितीय मानांकित कविता राणाचा १३-११, ११-४ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
तत्पूर्वी झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात मिथुन निमसटकरने अजिंक्य नवगिरेवर ११-९, ११-९ असा तर कुलदीप वार्ष्णेयने अभिजित दळवीवर १४-१२, ११-९ असा विजय संपादन केला. महिला उपांत्य सामन्यात सुभ्रदिता कर्माकरने प्रार्थना मास्तुरला ११-२, ११-३ असे तर कविता राणाने कृतिका अग्रवालला १२-१०, ११-५ असे हरविले. दोन्ही गटामधील पहिल्या चार विजेत्या-उपविजेत्यांनी बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय टेबल टेनिस पुरुष व महिला संघात स्थान पटकाविले आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने ही स्पर्धा वायएमसीए टेबल टेनिस गृहामध्ये संपन्न झाली.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *