अशोक गायकवाड
मुंबई : असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राष्ट्रीय महत्त्वाची दोन वैद्यकीय प्रकाशने राज्यपालांना भेट दिली. यामध्ये प्रौढांच्या लसीकरणासंदर्भातील तज्ज्ञांचे एकत्रित मार्गदर्शन आणि शिफारशी असलेल्या ‘प्रौढ लसीकरणाबाबत एकत्रित तज्ज्ञ मार्गदर्शक सूचना २०२६’ या प्रकाशनाचा समावेश आहे. हे प्रकाशन इंडियन मेडिकल असोसिएशनने विविध वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने प्रसिद्ध केले आहे. दरवर्षी विषाणूजन्य संसर्गामुळे देशात सुमारे पाच लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यापैकी अनेक मृत्यू लसीकरणाच्या माध्यमातून टाळता येऊ शकतात, अशी माहिती डॉ. वोरा यांनी दिली. दुसरे प्रकाशन ‘दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकार मार्गदर्शक २०२६’ या शीर्षकाचे असून, भारतातील दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकारांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशींचा त्यात समावेश आहे. या आजाराचे योग्य निदान कसे करावे आणि प्रभावी उपचारपद्धती कोणत्या असाव्यात, याबाबत या प्रकाशनातून मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. राकेश बडदे, डॉ. मिलिंद नाडकर्णी, डॉ. अमित सराफ, डॉ. जयस लेले, आशुतोष पांडे तसेच झायडस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती दलाल यांच्यासह संस्थेचे अन्य सदस्य उपस्थित होते.
