मुंबई: लोकसभा निवडणुकीतनंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांच्या वागण्यात बदल झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून गेल्याने जोरदार राजकीय चर्चा रंगली होती. आता विधानभवनाच्या प्रांगणात कालपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी, एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न असलेल्या ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये पुसटसा का होईना पण संवाद होताना दिसत आहे. या चर्चेसाठी पुन्हा एकदा निमित्त ठरली ती म्हणजे विधानभवनात मंगळवारी झालेली देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज नेहमीप्रमाणे विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना विधानभवनाच्या लॉबीत घडलेला प्रसंग सध्या सर्वतोमुखी झाला आहे. मंगळवारी दुपारी विधानभवनाच्या लॉबीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे यांची ओझरती भेट झाली. काही दिवसांपूर्वी विधानभनवाच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच भेट झाली होती. तोच धागा पकडत आदित्य यांनी मिश्कीलपणे भाष्य केले. यावेळी फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात हसतखेळत संवाद झाला. आदित्य ठाकरेंना पाहून फडणवीसांनी विचारले की, नमस्कार काय चाललंय? त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी लिफ्टमधून चाललोय. आदित्य यांच्या या वाक्यावर देवेंद्र फडणवीस अगदी मनमोकळेपणाने खळाळून हसले. आदित्य ठाकरेही त्यावर जोरात हसले. यानंतर दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले.
