०००००
कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
अनिल ठाणेकर
ठाणे : T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल व भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हांबरे, संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचे विधिमंडळ परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित राहून अत्यंत समाधान वाटत असल्याची भावना आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.
काल विधिमंडळात मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करावा अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली होती. या विनंतीस मान देत हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधिमंडळातील सदस्यांचे मनापासून आभार आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. तसेच मुंबई प्रीमीयर लीगचे चेअरमन विहंग सरनाईक यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये या चारही खेळाडूंचा तसेच गोलंदाज प्रशिक्षक, संघ व्यवस्थापकांचा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे व इतर विधिमंडळ सदस्य आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. विधिमंडळात कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मराठीत आपल्या भावना व्यक्त करत सर्वांची मनं जिंकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट खेळाडूंना राज्य सरकारच्यावतीने ११ कोटीचे बक्षीस जाहीर केले. विधानसभेत भारतीय क्रिकेट संघातील मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करावा अशी विनंती केली त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन केले.
०००००
